ह्युंदाई कंपनीची संपूर्ण इलेक्ट्रिक कार बाजारात

कृषिकिंग: ह्युंदाई कंपनीने भारतात नुकतीच कोना ही संपूर्ण इलेक्ट्रिक कार बाजारात आणली आहे. एका वेळी चार्ज केल्यानंतर ही कार सुमारे 452 किलोमीटर धावते, असा कंपनीचा दावा आहे. स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) प्रकारातली ही कार असून तिची किंमत 25 लाख रूपयांच्या घरात आहे. इतर वाहन उत्पादक कंपन्यांनीही इलेक्ट्रिक वाहनांच्या संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. येत्या काही वर्षांत या श्रेणीतील आणखी वाहने बाजारात येण्याची शक्यता आहे. सध्या इलेक्ट्रिक कार स्वरूपातील ही वाहने महागडी असून अतिउच्च उत्पन्न गटातील लोकांसाठीच ती बाजारात आणली जात आहेत. परंतु सरकारने पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास या वाहनांच्या किंमती कमी होऊ शकतात. सरकार धोरणात्मक स्तरावर या बाबीला अनुकूल असून पायाभूत सुविधांचे चित्र बदलण्यास सुरू होईल. त्यामुळे आगामी काही  वर्षांत सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात ही वाहने येऊ शकतील, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसे झाल्यास पेट्रोल-डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणावर कमी होईल. त्यामुळे त्यात मिसळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इथेनॉलचीही मागणी झपाट्याने खाली येईल. त्याचा थेट फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. कारण सध्या अतिरिक्त साखर उत्पादनामु्ळे जेरीस आलेल्या साखर उद्योगाला इथेनॉल निर्मिती हाच एकमेव आशेचा किरण दिसतो आहे. केंद्रीय रस्तेवाहतुक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनीही साखऱ कारखान्यांना इथेनॉल निर्मिती वाढविण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे सांगितले आहे. तसेच देशातील आजारी व बंद पडलेल्या साखर कारखान्यांचे रूपांतर इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांत करण्याचे सुतोवाच केले आहे. या पार्श्वभूमीवर दीर्घकालिन विचार करता इथेनॉलची मागणी कमी झाल्यास साखर उद्योगाचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इथेनॉलचा उपयोग बायोप्लॅस्टिक निर्मितीसाठी करण्याचा प्रकल्प यशस्वी झाल्याची माहिती गडकरी यांनी पुणे येथील साखर परिषदेत दिली होती. इथेनॉलचा इंधनात मिश्रणाव्यतिरिक्त इतर कोण-कोणत्या क्षेत्रांत वापर करता येणे शक्य आहे, यावर आतापासूनच संशोधन करण्याची आवश्यकता आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. 

Read Previous

पुढील दोन आठवडे पावसात खंड पडण्याची शक्यता

Read Next

राज्यात केवळ 43 टक्के पेरण्या पूर्ण