यंदा देशात कापूस लागवड घटणार

कृषिकिंग: यंदा पावसाला दोन आठवडे झालेला उशीर आणि गेल्या हंगामात कापसाला तुलनेने मिळालेला कमी दर यामुळे यंदा देशात कापसाची लागवड घटण्याची चिन्हे आहेत. शेतकऱ्यांनी कापसाऐवजी सोयाबीन व इतर तेलबिया पिकांना पसंती दिली आहे.
गेल्या वर्षी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा या प्रमुख कापूस उत्पादक राज्यांना दुष्काळाचा मोठा फटका बसला. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. परंतु तरीही कापसाच्या दरात फारशी सुधारणा झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना तुलनेने कमी परतावा मिळाला. गेल्या वर्षी (2018-19) कापसाच्या बाजारभावात केवळ पाच टक्के वाढ झाली. तर सोयाबीन आणि भुईमुगापासून मिळालेल्या परताव्यात अनुक्रमे 17 टक्के व 56 टक्के वाढ झाली.तसेच यंदा केंद्र सरकारने कापसाच्या किमान आधारभूत किंमतीत केवळ 2 टक्के वाढ केली आहे. यंदा लांब धाग्याच्या कापसासाठी प्रति क्विंटल 5550 रूपये आधारभूत किंमत आहे, तर मध्यम धाग्याच्या कापसासाठी 5255 रूपये आधारभूत किंमत आहे.  गेल्या वर्षी ( 2018-19) कापसाच्या आधारभूत किंमतीत प्रत्येकी 1130 रूपयांची वाढ करण्यात आली होती. त्या तुलनेत यंदा केवळ शंभर रूपयांच्या घरात वाढ मिळाली आहे. त्या तुलनेत सोयाबीन आणि भुईमुगाच्या आधारभूत किंमतीत अनुक्रमे 9 टक्के व 5 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाऐवजी तेलबिया पिकांचा पेरा वाढवला आहे. पाच जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस लागवडीत 8 टक्के घट झाली आहे, तर भुईमुगाचा पेरा 7 टक्के वाढला आहे. 

Read Previous

जगातील शेती उत्पादक देशांबाबत माहिती

Read Next

मका आयात लवकर झाली तरच पोल्ट्रीउद्योगाला फायदा