मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु

कृषिकिंग : यंदा मॉन्सून कालावधीत देशात सरासरी ११० टक्के पाऊस पडला. यंदाच्या वर्षी उशिराने झालेले आगमन, पावसाचे प्रमाण, परतीची सुरुवात या सर्वच बाबतीतील विक्रम मोडले गेले आहेत. केरळमध्ये आठ दिवस उशिराने आगमन झाल्यानंतर साधारणत: वेळेच्या पाच दिवस उशिराने (१९ जुलै) मॉन्सूनने देश व्यापला.

साधारणत: १ सप्टेंबरला देशातून माघारी फिरणाऱ्या मॉन्सूनने सव्वा महिना अधिक मुक्काम केला. अखेर मान्सूनने ९ ऑक्टोबर रोजी मान्सूनने पश्‍चिम राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू केला. उशिरा आगमन झालेल्या मॉन्सूनचा यंदा हा आतापर्यंतचा सर्वांत उशिराने परतीचा प्रवास ठरला आहे. यापूर्वी १९६१ मध्ये १ ऑक्टोबरला मॉन्सूनने पश्‍चिम राजस्थानमधून मुक्काम हलविला होता. परतीच्या प्रवासाला पोषक हवामान असल्याने शुक्रवारपर्यंत (ता. ११) वायव्य आणि मध्य भारतातील आणखी काही भागांतून मॉन्सून परतणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर महाराष्ट्रातून १५ ते २० ऑक्टोबर या कालवधीत मॉन्सून माघारी फिरण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत.

Read Previous

थंडीत करडांची काळजी

Read Next

कांदा बाजारातील आवक मंदावलेलीच