निविदा प्रक्रिया रखडल्याने कृत्रिम पावसाचा प्रयोग लांबणीवरकृषिकिंग: मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ पडण्याची भीती निर्माण झालेली असताना निविदा प्रक्रिया रखडल्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग लांबणीवर पडला आहे. यंदा पाऊस लांबल्यामुळे जून महिन्यातच कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्याची गरज होती. परंतु निविदा प्रक्रिया रखडल्यामुळे आता जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाण्याची शक्यता आहे.

कोरडा गेलेला जून, जुलै महिन्यातही अपुरा पाऊस आणि आता पुढील दोन आठवडे पाऊस दडी मारण्याचा अंदाज यामुळे मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात मराठवाडय़ात आणि नंतर विदर्भात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य अतुल देऊळगावकर यांनी दिली. भारतीय उष्ण कटीबंधीय हवामान संशोधन संस्थेच्या वतीने  (आयआयटीएम)सोलापूर येथे रडार तनात करण्यात आले आहेत.

सोलापूरपासून २०० किलोमीटर अंतरावर असणारे ढग या रडारच्या टप्प्यात येतात. त्यामुळे लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली या मराठवाडय़ातील जिल्हय़ांना याचा लाभ होऊ शकतो. ढगामध्ये पाण्याचे प्रमाण योग्य असेल, वाऱ्याचा वेग फारसा नसेल तर कृत्रिम पाऊस पाडता येतो. ढगामध्ये पाण्याचे प्रमाण किती आहे यावर पाऊस पडणे अवलंबून आहे. राज्य शासनाने धरणक्षेत्रावरील ढगांना प्राधान्य द्यावे अशा सूचना दिल्या आहेत. ज्यामुळे पडलेला पाऊस धरण क्षेत्रात पडेल व ते पाणी किमान पिण्यासाठी उपलब्ध होईल.

Read Previous

मायक्रोफायनान्स कर्जवाटपात 40 टक्के वाढ

Read Next

कांदा सल्ला: पुनर्लागण पद्धती