टिकवा जमिनीची सुपीकता – एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीचा वापर

कृषिकिंग : एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीचा वापर –
१) या पद्धतीमध्ये निरनिराळ्या निविष्ठांचा वेगवेगळ्या पिकांना विविध अवस्थांमध्ये अन्नद्रव्यांचा पुरवठा करताना अचूक आणि काटेकोर पद्धतीने वापर करीत असताना माती आणि पाणी परीक्षण तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण, कमतरता असलेली अन्नद्रव्ये इत्यादींचे योग्य निदान करूनच खतांचा वापर फायदेशीर ठरतो.
२) ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य स्वरूपाची खते पिकाच्या गरजेनुसार दिल्यामुळे अन्नद्रव्यांची कार्यक्षमता खूप मोठ्या पटीने वाढविता येते. खताचा योग्य प्रकार, गरजेनुसार मात्रा, वापरण्याची योग्य पद्धत, ठिकाण आणि योग्य वेळ इत्यादी बाबींचे काटेकोर पालन करून अन्नद्रव्यांचा पुरवठा शाश्‍वत शेतीसाठी गरजेचा आहे.
३) जमिनीची सुपीकता वाढविण्याच्या दृष्टीने एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीस फार महत्त्व आहे. सध्या रासायनिक खतांच्या अयोग्य आणि जास्त वापरामुळे आणि सेंद्रिय खतांच्या अभावामुळे जमिनीच्या सुपीकतेत मोठी घट येऊन अन्नद्रव्यांच्या प्रमाणात तूट आहे. ही तूट भरून काढण्यासाठी आणि अन्नद्रव्यांचा भविष्यातील ऱ्हास थांबविण्यासाठी विविध पिके आणि पीक पद्धतींना एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीनुसार नियोजनबद्ध खत व्यवस्थापन करण्याची गरज आहे. सुपीक जमिनींवर खतांना प्रतिसाद योग्य मिळतो आणि घटक उत्पादकतेत वाढ होऊन खर्चात बचत होते.
४) पिकांच्या गरजेएवढ्या अन्नद्रव्यांच्या मात्रेचा पुरवठा जमिनीतून खते वापरूनच करावा लागतो.
५) फवारणी पद्धतीने अतिशय अल्प प्रमाणात अन्नद्रव्ये पुरविली जातात; परंतु ही फवारणीची पद्धत काही बाबतीत वापरणे खूप महत्त्वाचे असते. विशेषतः कमी प्रमाणात लागणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांसाठी ती योग्य ठरते.
६) काही विशिष्ट परिस्थितीत जमिनीतील खतांचा पुरवठाच होत नसेल. उदा. पाणथळ जमिनी, चुनखडीयुक्त जमिनी इत्यादीमध्ये फवारणीचा वापर फायद्याचा ठरतो. उभ्या पिकावरील काही अवस्थांमध्ये काही अन्नद्रव्यांची कमतरता जाणवल्यास लगेच फवारणी पद्धतीने पुरवठा करता येतो. फवारणी पद्धतीनुसार अन्नद्रव्यांची कार्यक्षमता खूप वाढविता येते; परंतु तिच्या मर्यादा लक्षात घ्यायला हव्यात.
७) शाश्‍वत शेतीसाठी जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आणि पीक उत्पादकता शाश्‍वत ठेवून पोषणमूल्यांची सुरक्षितता वाढविण्यासाठी सदर पद्धतीनुसार अन्नद्रव्यांचे काटेकोर व्यवस्थापन गरजेचे आहे.
८) पिकांची घटत चाललेली उत्पादकता, अन्नातील पोषणमूल्यांची कमी, शेतीतील खर्चातील वाढ, कीड व रोगांच्या वाढत आलेल्या समस्या, फळे, भाजीपाल्याची गुणवत्ता व दर्जा, सेंद्रिय निविष्ठांची टंचाई, सिंचनाच्या अपूर्ण सोई-सुविधा, अवर्षणामुळे वाढणाऱ्या पाणी आणि अन्नद्रव्यांच्या जमिनीतील समस्या, खालावलेली जमिनींची सुपीकता इत्यादी समस्यायुक्त बाबींमध्ये गुंतलेली शेती शाश्‍वत ठेवण्यासाठी योग्य व्यवस्थापन पद्धतींची गरज आहे.

स्त्रोत – विकासपिडीया

Read Previous

टिकवा जमिनीची सुपीकता

Read Next

कांद्यावरील निर्बंध हटवा, संघटनाचा सरकारला अल्टीमेट