गूळनिर्मितीसाठी उसाच्या जाती

गुळाची प्रत आणि रंग हे मुख्यत्वेकरून उसाच्या जातीवर अवलंबून असतात. निरनिराळ्या ऊस जातींच्या रसामधील रासायनिक गुणधर्मांमध्ये फरक आढळून येतो. म्हणून शिफारस केलेल्या ऊस जातीची निवड करावी.

1) लवकर पक्व होणाऱ्या जाती: कोसी 671, को 8014, को 7219, को 92005

2) मध्यम उशिरा ते उशिरा पक्व होणाऱ्या जाती : कोएम 7125, को 86032, को 7527, को 94012

उत्तम गूळ तयार करण्यासाठी ऊस पिकास सेंद्रिय, रासायनिक व जैविक अशा एकात्मिक अन्नद्रव्ययुक्त संतुलित खतांचा पिकाच्या अवस्थेनुसार वापर करणे गरजेचे आहे.

सेंद्रिय व जैविक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो व पोषक अन्नांशाची उपलब्धता वाढते आणि उसाची वाढ चांगली होते, त्यामुळे रसाची प्रत सुधारून चांगला गूळ तयार होतो. याकरिता सुरू उसासाठी हेक्‍टरी 20 टन, पूर्वहंगामी उसासाठी 25 टन आणि आडसालीसाठी 30 टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत वापरावे. शेणखताचा अभाव असल्यास पाचटाचे कंपोस्ट किंवा गांडूळ खत प्रति हेक्‍टरी पाच टन वापरावे किंवा हिरवळीच्या पिकांपैकी धैंचा किंवा ताग घेऊन 45 दिवसांचे झाल्यावर जमिनीत गाडावे आणि नंतर उसाची लागण करावी.

ऊस पिकास शिफारशीप्रमाणे भरणीपर्यंत सर्व रासायनिक खतांची मात्रा द्यावी. सुरू उसास 200 किलो नत्र, 115 किलो स्फुरद आणि 115 किलो पालाश, पूर्वहंगामी उसासाठी 272 किलो नत्र, 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पालाश, आडसाली उसासाठी 400 किलो नत्र, 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पालाश ही मात्रा द्यावी. रासायनिक खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये माती परीक्षणानुसार द्यावीत. शिफारशीपेक्षा जास्त व उशिरा नत्रयुक्त खत दिल्यास रसातील नत्र व ग्लुकोजचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे गुळाची प्रत खराब होऊन उताराही घटतो.

गुळाच्या टिकाऊपणावरही अनिष्ट परिणाम होतो, तसेच नत्र खताची मात्रा लागणीच्या वेळी दहा टक्के, लागणीनंतर 45 दिवसांनी 40 टक्के, 60 दिवसांनी दहा टक्के व उरलेली 40 टक्के 135 दिवसांनी द्यावी. स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक खते योग्य प्रमाणात दोन हप्त्यांत लागणीच्या वेळी व 135 दिवसांनी दिल्यास रसाची प्रत सुधारते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे ऊस पिकास आवश्‍यकतेनुसार ऊस वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांत पाणी द्यावे.

संपर्क : 1) 02169-265335 मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा.

2) 0231- 2551445 प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर.

2) जल-मृद्‌संधारणासाठी कोणत्या गवताची लागवड करावी?

  • विश्‍वास काळे, राधानगरी, जि.कोल्हापूर.

कुश गवत : हे गवत बहुवार्षिक आहे. कमी पाण्यावर येणारे हे गवत खोडाच्या किंवा मुळांच्या छाटाने लागवड करतात.

मुंज : हे गवत पाच मीटरपर्यंत वाढते. खोड ताठ, जोरदार कांडे असणारे असते. या बहुवर्षायू गवताची लागवड बिया किंवा खोडाच्या छाटापासून केली जाते. लागवड बियांपासून केली जाते.

वाळा (खस) : या बहुवर्षायू गवताची उगवण दाट होते. हे गवत मृद्‌संधारणासाठी अतिशय चांगले मानले जाते. लागवड “स्लिप्”‘पासून केली जाते.

कुंदा : हे गवत तीन फुटांपर्यंत वाढते. बहुवर्षायू या गवताला आडवे खोड असते. त्यापासून धुमारे निघतात आणि बियांपासून याची लागवड होऊ शकते.

पवना : सुमारे तीन फुटांपर्यंत वाढणाऱ्या या बहुवर्षायू गवताचे खोड मुळाजवळ जाड, भक्कम व गुळगुळीत असते. लागवड बियांपासून होते.

शेंडा : हे बहुवर्षायू गवत दोन फुटांपर्यंत वाढते. पवना गवतासारखे दिसणारे, मात्र खोड थोडे लवचिक असते. लागवड बियांपासून होते.

मोशी : डोंगरउतारावर वाढते. हे बहुवर्षायू गवत आहे.

स्त्रोत – विकासपिडिया

Read Previous

आघाडीचा जाहीरनामा फसवा – मुख्यमंत्री

Read Next

बैलाच्या खांदेसुजीवर उपचार