
राज्यात वनशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना
कृषिकिंग: राज्यातील ४८ हजार ४५५ शेतकऱ्यांनी वनशेतीसाठी ऐच्छिक नोंदणी केली आहे. या शेतकऱ्यांच्या शेतात जवळपास २२ लाख २३ हजार ९८० फळझाडं व इतर वृक्षांची लागवड केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
वृक्षलागवड मोहिमेत जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढावा, त्यातून सामान्य माणसाला रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने नियोजन विभागाने “महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनें”तर्गत वैयक्तिक लाभार्थींच्या शेताच्या बांधावर, शेतजमीनीवर वन विभागाच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत वन शेती फुलवण्याचा निर्णय घेतला आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असा दावा मुनगुंटीवार यांनी केला आहे.
वनशेतीमध्ये साग, चंदन, खाया, बांबू, निम, चारोळी, महोगनी, आवळा, बेहडा, हिरडा, अर्जून, सीताफळ, चिंच, जांभूळ, बाभूळ, अंजन, खैर, शेवगा, हदगा, आंबा, काजू, फणस, यासारख्या ३१ प्रजातींचा समावेश आहे.
महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३.०७ लाख चौ.कि.मी असून त्यातील केवळ २० टक्के क्षेत्र वनाखाली आहे. राष्ट्रीय वननीतीनुसार आवश्यक असलेल्या क्षेत्रापेक्षा ते ३१ हजार २४८ चौ.कि.मी ने कमी आहे. राज्याचे वृक्षाच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत वाढवायचे असेल तर वनेतर क्षेत्रात वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारने वनशेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. वनशेती योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा, असे आवाहन मुनगुंटीवार यांनी केले आहे.