पशुपालकांना पडणारे नेहमीचे प्रश्न

कृषिकिंग: सर्वसामान्य पशुपालकांना नेहमीच काही प्रश्न पडतात. या प्रश्नांचे उत्तरे प्रस्तुत प्रश्न मालिकेतून जाणून घेऊया.
प्रश्न: लाळ्या खुरकूत रोगप्रतिबंधक लस किती वेळा टोचावी? 
उत्तर: कोणत्याही कंपनीने तयार केलेली प्रतिबंधक लस दर 5 ते 6 महिन्यांनी टोचली गेली पाहिजे. छोट्या वासरांच्या शरीरात प्रतिकारशक्ति निर्माण करावयाची असेल तर चीकामध्ये या प्रतिकारशक्तीचे कण भरपूर प्रमाणात आले पाहिजेत. म्हणून गायी /म्हशी विण्यास 40 दिवस असतांना ही लस न चुकता टोचावी. प्रत्येक पशुकरिता वेगवेगळी सुई वापरावी.लसीची बाटली बर्फातच ठेवणे आवश्यक आहे. 
प्रश्न: गायींना रोज धुवावे का? 
उत्तर: हा प्रश्न बहुतेक सर्वच गोपालक विचारत असतात. महत्त्वाचे हे आहे की, गाय स्वच्छ राहिली पाहिजे,तिची कास/ आजूबाजूचा भाग हा जास्तीत जास्त स्वच्छ असावा. तसेच आपल्याकडे पाण्याची उपलब्धता किती आहे त्यावरही हे अवलंबून आहे. गायीच्या अंगावर भरपूर केस असल्याने त्या केसांत हवेतील माती, गोठ्यातील शेण चिटकतात व तेथे ते वाळते (शेपटीचा गोंडा हा नेहमीच खुळखुळा होतो) त्यामुळे पाण्याची कमतरता असेल तर गायीच्या शरीराचा शेपटीच्या गोंड्याचा रोजच्या रोज खरारा (याकरिता ब्रश, काथ्याचे हातमोजे, रोलरब्रश) करणे आवश्यक आहे. दूध काढण्या अगोदर व नंतर कासेची साफसफाई सकाळ/संध्याकाळ पाण्याने झाली पाहिजे. उन्हाळ्यात मात्र गायीच्या शरिराचे तापमान संतुलित राखण्याकरिता दुपारच्या वेळी (11 ते 3 पर्यंत) तिला पाण्याने धुणे महत्वाचे आहे. 
प्रश्न: गोठ्यात हवा थंड ठेवण्यासाठी कोणत्या सोयी कराव्यात? 
उत्तर: गोठ्यात कधीही सिलींग फॅन लावू नयेत. 180 च्या कोनात फिरणारे पंखे भिंतीवर बसवावेत. म्हणजे हवा सर्व बाजूनी खेळती राहिल. (सिलींग फॅन छताला बसविल्यामुळे पंख्याखालील गायीला गरम हवेचा जास्तप्र माणात त्रास होतो) गायीच्या गोठ्यांत पाण्याचे बारीकबारीक कण तयार करणारे फॉगर जमिनीपासून 8 ते 9 फुटावर बसविणे गरजेचे आहे. त्याबरोबर फिरता पंखा असणे आवश्यक आहे. म्हशीच्या गोठ्यांत कधीही फॉगर बसवू नका. म्हशीच्या अंगावर जाडजाड थेंबाचे पाणी पडेल असे शॉवर म्हशीपासून (उभे राहिल्यानंतर) वर एक ते दीड फूटांवर बसवावेत. पंखा लावण्याची सोय नसेल तर गायी/म्हशींच्या अंगावर गार पाण्याने भिजवलेली बारदान बांधावी व अधूनमधून त्याच्यावर पाणी टाकत रहावे. 
डॉ. वासुदेव सिधये, पशुतज्ज्ञ व सल्लागार

Read Previous

हळद पीक सल्ला: नत्र व्यवस्थापन

Read Next

पुढील दोन आठवडे देशभरात चांगला पाऊस