कांदयाला चांगले बाजारभाव मिळण्यासाठी योग्य मार्केटिंग सिस्टम उभारण्याची गरज

कृषिकिंग : शेती मालाचे भाव मुख्यत्वे पुढील गोष्टींवर अवलंबून असतात. कांदा पिकाचा विचार करता पुढील काही बाबी बाजारभावावर प्रभाव टाकतात.
१. उत्पादन
२. मागणी
३. आयात – निर्यातीच्या बाबतीतील सरकारी धोरण
४. आपत्कालीन परिस्थिती -अतिवृष्टी, दुष्काळ,रोगराई (अल्पकालीन परिणाम आणि दीर्घकालीन परिणाम )
५. एक पिकाचा दुसऱ्या पिकाच्या बाजार भावावर होणारा परिणाम
६. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी

यंदाच्या वर्षी कांदा उत्पादक असलेल्या भागामध्ये लांबलेल्या मान्सूनमुळे लागवडी खालील क्षेत्र कमी झाले. त्यातच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या मान्सूनच्या अतिवृष्टी मुळे कांदा उत्पादनामध्ये कमालीची घट येणार आहे. कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार सुमारे खरीप कांद्याचे ४०% इतके उत्पादन कमी होणार आहे. यामुळे देशभरातील कांद्याचे भाव वाढले आहेत. सध्या कांद्याला ठोक बाजारामध्ये प्रति किलो २५ ते ५० रूपये पर्यंत प्रतवारीनुसार भाव भेटत आहेत तर शेवटच्या ग्राहकाला ६० ते ७० इतक्या भावाने कांदा मिळतोय. ऑक्टोबर महिना संपेपर्यंत रब्बी पिकाच्या लागवडीसाठीचे अनुकूल वातावरण नाही याचा परिणाम रब्बी हंगामातील कांदा लागवडी वर होणार आहे.

चीन आणि भारत हे दोन देश कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर आहेत. एकूण उत्पादनामध्ये भारताचा वाटा २३ % आहे तर चीनचा २२% इतका वाटा आहे. या दोन देशाचा मिळून वाटा ४०% च्या वर आहे. परंतु या दोन्ही देशामध्येच कांदा खाणारा ग्राहक मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे देशातील सरकार ग्राहकाचा विचार करून निर्यातबंदी करणे,  कांदा निर्यातीवर जास्तीचा निर्यात कर लावणे. एमईपी लागू केल्याने कांद्याच्या बाजारपेठमध्ये अपेक्षित उठाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव भेटत नाही. सध्या भारताबाहेरील इजिप्त, अफगाणिस्तान आणि इराण मधील कांदा देशात आणण्याचे प्रयत्न सरकार कडून चालू आहेत.

कांदा उत्पादनात भारत क्रमांक १ चा उत्पादक देश असूनही अनेक वेळा जगातील इतर देशातून कांदा आयात करावी लागत आहे . या कांद्याची भारतीय कांदया बरोबर तुलना होत नाही.तुलनात्मक दृष्ट्या क्वालिटी, चव, रंग आणि रासायनिक पदार्थ ची बरोबरी होत नाही या मुळे आयातीवर सुद्धा मर्यादा येतात. ग्राहक आणि उत्पादक यांचा समतोल साधून व्यापक हिताचा विचार करून अनुकूल धोरणे आखल्यास शेतकऱ्यांचं तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे जीवनमान सुधारेल.

फसलेले कांदा निर्यात धोरण : कांदा निर्यातीमध्ये भारत प्रथम क्रमांकावर होता परंतु २०१४ नंतर कित्येक वेळा केलेल्या निर्यात बंदी आणि वाढवलेली ‘एमईपी’मुळे निर्यातीमध्ये सातत्य राहिले नसल्याने क्रमांक १ ची जागा चीनने घेतली आहे. याचा परिणाम भारतातील व्यापाऱ्यांनी कायमस्वरुपी पूरवठादार (Constant supplyers )चा दर्जा गमावला आहे. याच बरोबर देशाला मिळणाऱ्या परदेशी चलनावर हि भारतला पाणी सोडावे लागले पर्यायाने यामध्ये शेतकऱ्यांचे खूप मोठं नुकसान होत आहे.

भारतातून कांद्याची निर्यात मलेशिया, सौदी अरेबिया, बांग्लादेश, पाकिस्तान या देशामध्ये होते. शेतकऱ्यांना १ किलो कांदा पिकवण्यासाठी साधारणतः सुमारे ६ ते ८ रुपये इतका खर्च येतो. यावर्षी  सुरवातीला कांद्याचे भाव प्रचंड पडले होते. जानेवारी ते मे या महिन्यात कांद्याला फक्त २ ते ६ रुपये इतके तुटपुंजे भाव भेटत होते. याच काळात मुख्यत्वे करून कांदा बाजारात येत असतो परंतु सरकारचे निर्याती विषयीचे चुकलेल्या धोरणामुळे कांदा उत्पादक असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात बहुसंख्य शेतकरी या सरकारी धोरणामुळे कर्जाच्या खाईमध्ये जात आहेत.

कांदा साठवणुकीची आवश्यकता : गेल्या पाच वर्षाच्या प्राथमिक अंदाजानुसार कांदा उत्पादन हे रब्बी  हंगामात जास्त होते (पीक लागवड ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यात तर बाजारपेठेमध्ये दाखल होण्यास ४ ते ५ महिन्याचा कालावधी जातो.) फेब्रुवारी पासून ते मे महिन्यामध्ये कांद्याचे उत्पादन बाजारात जास्त प्रमाणात येते. परंतु त्यानंतरच्या काळात कांद्याच्या पुरवठयामध्ये कमी येऊ लागते. शेतकऱ्यांनी कांदा चाळ उभा करून कांदा साठवणूक केल्यास सप्टेंबर ऑक्टोबर महिन्या दरम्यान चांगला परतावा भेटू शकतो.

खरीप हंगामातील म्हणजेच जून-जुलै महिन्यातील लागवड देशातील खूप कमी भागात येते त्याचा मार्केटवर त्याचा हि परिणाम दिसून येतो. खरीप हंगामाच पीक मुख्यत्वे नाशिक मध्ये घेतले जाते परंतु या वर्षी खरीप हंगामातील पीक पावसाने धोक्यात आल्याने कांदा बाजार वाढलेला आहे.

बाजार व्यवस्थापन बदलण्याची आवश्यकता : कांदा भाववाढ रोखण्यासाठी शेतकरी आणि ग्राहक अश्या दोन्ही गटाला परवडणारी वेगळी व्यवस्था उभारण्याची आवश्यकता वाटू लागलेली आहे. एकूण प्रक्रियेतून शेतकऱ्यांना पुरेसा फायदा कधीच होत नाही.  त्यामुळे बाजार व्यवस्थापन करणारी वेगळी रचना केल्यास यातून मार्ग काढता येऊ शकेल आणि शेतकऱ्यांना यातून फायदा होऊ शकेल.

चालू घडामोडी आणि बाजारभाव साठी कृषिकिंग वेबसाईट ला भेट ध्या

Read Previous

पशु प्रजननसाठी महत्त्वाची खनिजे

Read Next

पशूंना खनिज मिश्रण देण्याचे प्रमाण