पुढील दोन आठवडे पावसात खंड पडण्याची शक्यता

कृषिकिंग: पुढील दोन आठवडे मध्य आणि पश्चिम भारतात पावसाचा खंड पडणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात पुढच्या पंधरवड्यात पाऊस होणार नसल्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात जून महिना पूर्ण कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यातसुध्दा पावसाचे प्रमाण कमीच आहे. तुरळक ठिकाणीच चांगला  पाऊस झाला असून इतर ठिकाणी मात्र अजून पावसाने ओढच दिलेली आहे. काही ठिकाणी तुटपुंज्या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकलेल्या आहेत. ते चांगल्या पावसाची वाट पाहत आहेत. परंतु हवामानशास्त्र विभागाचा अंदाज पाहता पुढील दोन आठवडे शेतकऱ्यांची परीक्षा पाहणारे असून मराठवाड्यात दुष्काळ पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. देशात मॉन्सून उशीरा दाखल झाला आणि नंतर वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून घेतल्यामुळे मॉन्सूनची वाटचाल रखडली. त्यामुळे देशभरात जून महिन्यात पुरेसा पाऊस झाला नाही. पावसाच्या प्रमाणात २८ टक्के तूट आली. जूलै महिन्यात देशाच्या अनेक भागांत चांगला पाऊस झाल्याने ही तूट निम्म्याने कमी होऊन १४ टक्क्यांवर आली. परंतु पुढील दोन आठवडे पावसात खंड पडण्याची शक्यता असल्याने ही तूट आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. दोन आठवड्यानंतर चांगला पाऊस होईल, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सून पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.पुढचे दोन आठवडे अत्यंत महत्त्वाचे असून या कालावधीत पावसात खंड पडल्यास पिके धोक्यात येतील, असे तज्ज्ञांनी सांगितले.

Read Previous

मराठा आरक्षणाला स्थगिती नाही

Read Next

ह्युंदाई कंपनीची संपूर्ण इलेक्ट्रिक कार बाजारात