पशुप्रजननासाठी खनिजद्रव्ये

दुधाळ गाई आणि म्हशींना दुग्धोत्पादन आणि प्रजनन टिकवून ठेवण्यासाठी बरीच खनिजद्रव्ये आवश्‍यक असतात. जनावरांच्या शरीरात खनिज तयार होत नसल्याने ती खनिज मिश्रणाद्वारे पुरविणे आवश्‍यक असते. क्षेत्रनिहाय खनिज मिश्रण वापरणे जास्त परिणामकारक आणि आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरते.

दुभत्या जनावरावर होणाऱ्या एकूण खर्चापैकी ६० ते ७० टक्के खर्च त्यांच्या खाद्यावर होतो. जनावरांना पाणी, तेलयुक्त पदार्थ, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, कर्बोदके, क्षार आणि जीवनसत्त्वे या पोषण मूल्यांची आवश्‍यकता असते. त्यापैकी क्षार हा घटक जनावरांना अल्प प्रमाणात लागतो. परंतु जनावरांच्या दुग्धोत्पादनासाठी आणि प्रजनन टिकवून ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. शेतकरी जनावरांच्या आहारात धान्य, पेंढी, हिरवा आणि सुका चारा याचा अवलंब करतात, ज्यातून जनावरांना प्रथिने, कर्बोदके, तेलयुक्त पदार्थ उपलब्ध होतात. परंतु या घटकांमधून जनावरांना योग्य प्रमाणात खनिज म्हणजेच क्षार उपलब्ध होत नाही.

क्षारांची गरज भागविण्यासाठी जनावरांच्या आहारात खनिज मिश्रणाचा वापर करावा लागतो. बऱ्याच पशुपालकांना खनिज मिश्रण हा घटक माहीत नसतो, परंतु या घटकांच्या कमतरतेमुळे जनावरांची दुग्धोत्पादन आणि महत्त्वाचे म्हणजे प्रजनन क्षमता कमी होते. पशु खाद्यामध्ये खनिज कमी प्रमाणात असतील, तर जनावऱ्यांच्या चयापचयाच्या क्रिया व्यवस्थित पार पडत नाहीत. खनिज कमतरतेचा परिणाम वासराच्या वाढीवर, मोठ्या जनावरांच्या दुग्धोत्पादनावर आणि प्रजोत्पादनावर होतो. खनिज जनावरांच्या शरीरात तयार होत नसल्याने ती खनिज मिश्रणाद्वारे पुरविणे आवश्‍यक असते.

दुधाळ गाई आणि म्हशींना दुग्धोत्पादन आणि प्रजनन टिकवून ठेवण्यासाठी बरीच खनिजद्रव्ये आवश्‍यक असतात. काही खनिजे जास्त प्रमाणात तर काही कमी प्रमाणात (सूक्ष्म खनिज) आवश्‍यक असतात. कॅल्शिअम, स्फुरद, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, सोडियम, क्लोरीन आणि सल्फर ही खनिजे तुलनेने अधिक प्रमाणात़ तर लोह, झिंक, मँगेनीज, तांबे, आयोडीन, कोबाल्ट, सेलिनिअम इत्यादी खनिजे कमी प्रामाणात लागतात.

शरीरातून स्रावाद्वारे बाहेर पडणाऱ्या क्षारांची उणीव भरून काढण्यासाठी, रक्तातील हिमोग्लोबिन, हाडातील कॅल्शिअम, स्फुरद व इतर क्षारांची झीज, स्नायूंची निरोगी अवस्था, पाचक रसाचे उत्पादन व सर्व शारीरिक क्रियांचे सुनियोिजत नियंत्रण करण्यासाठी जनावरांना क्षारांची गरज असते. जनावराच्या शरीरक्रिया संप्रेरक, पाचक रस व विकरांच्या नियंत्रणाखाली कार्य करतात. त्यांना कार्यक्षम ठेवण्यासाठी त्यांच्या कार्याला गती देण्यासाठी खनिज क्षारांची गरज असते. त्यामुळे शरीरातील कोणतीही क्रिया क्षारांच्या अभावी होऊ शकत नाही.

स्रोत – विकासपीडिया

Read Previous

पंचनाम्यासाठी २० लाख शेतकऱ्यांचे अर्ज : कृषी आयुक्त

Read Next

ऐतिहासिक बाबरी मशीद प्रकरणाचा आज निकाल