मका आयात लवकर झाली तरच पोल्ट्रीउद्योगाला फायदा

कृषिकिंग : केंद्र सरकारने आयातशुल्कात कपात करून चार लाख टन मका आयात करण्यास परवानगी दिली असली तरी येत्या दोन ते तीन महिन्यांत ही आयात झाली तरच फायदा होईल, असे मत पोल्ट्री उत्पादकांनी व्यक्त केले. ऑक्टोबरमध्ये नवीन पीक बाजारात येईल. त्या आधी आयात केलेला माल देशात पोहोचायला हवा. सध्या मक्याचा शिल्लक साठा जवळपास संपला आहे. कोंबडीखाद्याचा तुटवडा असल्याने पोल्ट्री उद्योगाने शेतकऱ्यांना पक्षी देण्यात कपात सुरू केली आहे, असे त्यांनी सांगितले.
सरकारने जून महिन्यात मक्यावरील 60 टक्क्यांचे आयातशुल्क कमी करून 15 टक्क्यांवर आणले आणि एक लाख टन मका आयात करण्यास परवानगी दिली. परंतु निविदा प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे हा माल अद्याप देशात पोहोचलेला नाही. कोंबडीखाद्याचे दर वाढल्यामुळे पक्षी आणि अंड्यांच्या दरावर परिणाम झाला आहे. दुष्काळ आणि अमेरिकी लष्करी अळीचा प्रादुर्भाव यामुळे गेल्या वर्षी मका उत्पादनात मोठी घट झाली. तसेच यंदाही पाऊस लांबल्याने मका पेरणीने वेग पकडलेला नाही. परिणामी मक्याच्या किंमती आभाळाला भिडल्या आहेत. पोल्ट्री उद्योगाकडून मक्याला मोठी मागणी असते. देशातील 60 टक्के मका पोल्ट्री उद्योगासाठी वापरला जातो. पोल्ट्री उद्योगाच्या एकूण उत्पादनखर्चामध्ये कोंबडीखाद्याचा वाटा सुमारे 70 टक्के असतो.

Read Previous

यंदा देशात कापूस लागवड घटणार

Read Next

जलशक्ती अभियानात पुरंदर व शिरूर तालुक्यांचा समावेश