मका दोन हजारावर, पुढे काय?

अॅग्रोवन’ मार्केट रिसर्च इनिशिएटीव्ह
पुणे, ता. 2 : नाशिक जिल्ह्यातील देवळा बाजार समितीत आज मक्याला उच्चांकी 2000 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. डिसेंबरमध्ये, ऐन आवक हंगामात प्रथमच दोन हजार रुपयाचा उच्चांक झाला.

नाशिक जिल्ह्यांतील देवळा बाजार समितीअंतर्गत 11 ते 12 टक्के आर्द्रतेच्या मक्यासाठी दोन हजार रुपये दर मिळालाय. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात मक्याचे बाजारभाव उंचावले आहेत. प्रतिक्विंटल दर पुढीलप्रमाणे सांगली – 1965, तेलंगणा – निजामाबाद 1895, बिहार – गुलाबबाग 2245.

देशात 82 लाख हेक्टरवर खरीपात मक्याचा पेरा झाला असून, अतिपावसामुळे हेक्टरी उत्पादकेत किती घट झालीय याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. तथापि, प्रतिहेक्टरी किमान 2 टन उत्पादकता गृहीत धरली तरी खरीपातून 164 लाख टन उत्पादन मिळेल. मक्याचे दुसरे पीक रब्बीत हंगामातून मिळेल. रब्बीचा सर्वसाधारण पेरा 17.5 लाख हेक्टर असून, या वर्षी दीर्घकाळापासून तेजीत असलेले बाजारभाव व भूजल वाढीमुळे रब्बीत क्षेत्र वाढीची अनुमान आहे. रब्बीत किमान 19 लाख हेक्टरवर पेरा आणि हेक्टरी चार टन उत्पादकता गृहीत धरली तरी 76 लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. खरीप आणि रब्बी मिळून 240 लाख टन मक्याची उपलब्धता ऑक्टोबर – सप्टेंबर 19-20 मध्ये असेल.

देशांतर्गत गरजेच्या तुलनेत इतकी उपलब्धता पुरेशी आहे. मात्र, रब्बीतील पिक जर लष्करी अळीमुळे बाधित झाले तर मात्र सध्याचा तेजीचा कल पुढेही सुरू राहील. दुसऱ्या बाजूला, रब्बी हंगामात मका चांगला पिकून आला तर मात्र 2020 मध्ये टप्प्याटप्प्याने आवक वाढत जाईल तसा मक्याच्या बाजारभावात नरमाईचा कल दिसू शकेल. आयातीचे टेंडर जारी : देशांतर्गत कॅटल फीड उद्योगाच्या मागणीवरून नाफेडने एक लाख टन मका आयातीचे टेंडर काढले असून, जानेवारी महिन्यात दक्षिण भारतातील बंदरावर पोच अपेक्षित आहे. तथापि, देशांतर्गत मागणीच्या तुलनेत आयातीचे प्रमाण अत्यल्प असल्याने त्याचा बाजारावर प्रभाव पडणार नाही. —

मक्याचा बाजारभाव का उंचावला

  • आगाप खरीप मका पावसामुळे झाला खराब
  • गेल्या वर्षीचे शिल्लक साठे नीचांकी
  • ऐन हंगामात पोल्ट्री व स्टार्च उद्योगाकडून मागणी
  • जादा बाजारभावाच्या अपेक्षेने स्टॉकिस्ट सक्रिय
  • देशांतर्गत दैनंदिन गरजेच्या तुलनेत आवक तोकडी
  • शेतकरी रब्बीत व्यस्त असल्यानेही आवक नाही
  • जादा बाजारभावाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांकडूनही मालाचे होल्डिंग

देशांतर्गत साप्ताहिक मका आवक
17 ते 24 नोव्हेंबर – 2.6 लाख टन
24 ते 29 नोव्हेंबर – 2.5 लाख टन

वरीलप्रमाणे बातम्या वाचण्यासाठी कृषीकिंग मोबाईल अॅप डाऊनलोड करा….कृषिकिंगचे फेसबुक पेज लाईक करा.

Read Previous

रब्बीच्या पीकविम्यासाठी ३१ डिसेंबर मुदत

Read Next

शेतकऱ्यांना कर्जमुक्‍त करणार