आघाडी सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी, जाहीरनाम्यात घोषणा

कृषिकिंग : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीने सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ‘शपथनामा’ जाहीर केला. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी, सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता अशी आश्वासने काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने जाहीरनाम्यातून दिली आहेत.

आघाडीच्या शपथनाम्यात उद्योग, शेती, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि नियोजनबद्ध शहरीकरण या सात मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. युवक काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा या शपथनाम्यात अंतर्भाव करत बेरोजगार युवकांना दरमहा ५ हजार रुपये बेरोजगार भत्ता देण्याचे तसेच स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के स्थान देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस पावले उचलत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येईल, असे आश्वासनही काँग्रेस आघाडीने दिले आहे.

आघाडीच्या शपथनाम्यातील काही ठळक मुद्दे

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी.
सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता.
शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण.
उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज.
राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमा.
कामगारांना किमान २१ हजार वेतन.
स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ.
सर्व महापालिका हद्दीतील ५०० चौरस फूट घरांना मालमत्ता करमाफी.
 ८० टक्के स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यासाठी विशेष कायदा करणार.
ठिबक आणि तुषार सिंचनासाठी १०० टक्के अनुदान देणार.
दुधाला उत्पादन खर्चावर आधारित भाव.
जात पडताळणी प्रक्रियेत सुटसुटीतपणा आणणार
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील मागास तालुक्यांमध्ये उद्योगधंदे वाढीसाठी स्वतंत्र धोरण आखणार.

Read Previous

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळणार अडीच हजार जणांना डाळमिल

Read Next

शेतकरी आत्महत्या वरून सरकारला घेरणार – खर्गे