शेळ्यांचा गोठा कसा असावा ?

कृषिकिंग : बरेचदा शेळ्यांचा गोठ्याचा तळ मातीचा, मुरमाचा, रेतीचा असावा यावरच भर दिलेला आहे. परंतु एखादी शेळी रोगट असल्यास तिच्या रोगट मलमुत्रातून जंतू बाहेर फेकले जातात व नंतर त्यांची जोमाने वाढ होते. यामुळे करडांमध्ये मरतुकीचे प्रमाण जास्त आढळते. मोठ्या शेळ्यांमध्ये सुद्धा सांसर्गिक रोगाचा धोका संभवतो. त्यामुळे व्यावसायिक शेळीपालनामध्ये शेळ्यांना हवामानातील बदलांच्या स्वरुपात त्यांचे रक्षण करता येईल असा गोठा बांधणे आवश्यक आहे. शेळीपालन व्यवसाय चिरकाल टिकणारा असल्यामुळे गोठा सुद्धा तसाच मजबूत बांधणे आवश्यक आहे. गोठा नेहमी स्वच्छ करता यावा, रोगाचे जंतू बसू नये यासाठी गोठ्याचा तळ सिमेंटचा असणे आवश्यक आहे. कारण मुरुमाचा किंवा मातीचा तळ नेहमीच डोकेदुखी ठरते.

शेळ्यांचा गोठा बांधतांना तो जमिनीपासून २ ते ३ फुट उंच असावा. शेळ्यांना ओलावा किंवा पावसामुळे फार त्रास होतो म्हणून तळ ओला राहू नये याची तजवीज करावी. पावसाळ्यात तळ उंच व लाकडी असल्यास उत्तम. कोवळे उन्ह आणि खेळती हवा शेळ्यांच्या घरात येईल अशा पद्धतीने तीन फुटाची भिंत चहूबाजूने बांधून घ्यावी. पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून ३ ते ४ फुटांचा ओव्हरहॅग घ्यावा. पाणी निघून जाण्यासाठी ६ इंचाचा उतार असावा तसेच गटर लाईन्स असावे. तळ खरबरीत असावा. मलमूत्रयुक्त पाणी सभोवताली लावलेल्या झाडांना पोचण्यासाठी सोय करावी. प्रत्येक वयाच्या शेळ्यांसाठी जातीनिहाय, वयानुसार वेगवेगळे कप्पे असावेत. कप्प्यात बसण्यासाठी व हालचाल करण्यासाठी मोकळी जागा असावी.

*विशेष सूचना:* गोठ्याच्या दाराजवळ ८ × ५ फुटाचे फुटबाथ असावे त्यात नेहमी चुना किंवा आयोडीन टाकावे. या फुटबाथमध्ये पाय ठेऊनच शेळ्यांच्या गोठ्यात प्रवेश करावा.

*-डॉ. गोविंदराव लोखंडे, माजी उपायुक्त, पशुसंवर्धन.

Read Previous

मुख्यमंत्र्यांनी 16 हजार शेतकऱ्यांची कुटुंब उद्धवस्त केली

Read Next

सहकार क्षेत्रातील सुधारणांसाठी कॉर्पोरेट कंपन्यांकडून प्रशिक्षण – सहकारमंत्री