एचटीबीटी कापसाचे पीक नष्ट करण्यास शेतकरी संघटनेचा विरोध

कृषिकिंग: परवानगी नसलेल्या एचटीबीटी कापूस वाणाची अवैधरित्या लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातले पीक नष्ट करण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य सरकारने केला तर शेतकरी संघटना त्याचा जोरदार विरोध करेल, असा इशारा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिला आहे. एचटीबीटी कापूस वाणाला परवानगी द्यावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेने सविनय कायदेभंग आंदोलन पुकारले आहे. त्यानुसार शेतकरी राज्यभरात या वाणाच्या बियाण्यांची उघडपणे लागवड करत आहेत.

विदर्भातील अकोली जहांगीर या गावातून या आंदोलनाची सुरूवात झाली. राज्य सरकारने या शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. तपासाचा भाग म्हणून सरकारी यंत्रणेने या अवैध लागवडीतील नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. हे बियाणे एचटीबीटी कापसाचेच असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून नुकतेच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अवैध लागवड केलेले एचटीबीटी कापसाचे पीक जप्त करून नष्ट करण्याची मोहीम सरकार हाती घेईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्र्वभूमीवर सरकारच्या अशा प्रयत्नांना शेतकरी संघटना जोरदार विरोध करेल, असे घनवट यांनी म्हटले आहे. आमचं जगणं या पिकावर अवलंबून असल्यामुळे सरकारला हे पीक नष्ट करायचे असेल तर त्याची भरपाई सरकारने शेतकऱ्यांना दिली पाहिजे, असेही ते म्हणाले.दरम्यान, केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहून अवैध एचटीबीटी कापूस लागवड प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश दिले असले तरी राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे राज्य सरकार कोणतीही कठोर कारवाई करण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.

krushikingadmin

Read Previous

आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा

Read Next

देशाच्या अन्नधान्य आयातीत मोठी घट