बैलांच्या खांदेसुजीवर उपचार

कृषिकिंग: खांदेसुजी: खांदेसुजी हा आजार प्रामुख्याने कामास जुंपलेल्या बैलांना होतो. यात खांद्यावरच्या कातडीचा भाग सुजलेला दिसतो. या आजाराचे प्रमुख कारण म्हणजे दिवसातील जवळपास सात ते आठ तास जनावरांच्या खांद्यावर जू राहते, ते खांद्यास सतत घासते; त्याचप्रमाणे जूचा खांद्यास घासणारा भाग खडबडीत असेल, बैलजोडी लहान- मोठी असेल किंवा एका बाजूस वजन जास्त व एका बाजूस कमी असेल, तरीही खांदेसुजी होते. बऱ्याच वेळा खांद्याच्या कातडीस सतत जूमुळे चिमटा बसणे यामुळेही हा रोग होतो. या रोगास नवीन जुंपलेली जनावरे जास्त बळी पडतात; तर पावसाळी वातावरणात खांद्याची कातडी ओलसर होऊन पुन्हा कामास जुंपल्यासही हा आजार बळावतो.

खांदेसुजीत प्राथमिक अवस्थेत साधारणतः खांद्यावर सूज येते. ही सूज बैलास कामावरून सोडल्यावर जास्त प्रमाणात दिसते. खांद्यावरील सूज ही गरम, लालसर दिसते. बऱ्याच वेळा खांद्याची कातडी घासून जाते व जखम होते. या जखमेतून रोगजंतूंचा प्रादुर्भाव होऊन बेंड (गळू) होण्याची शक्यखता असते. बऱ्याच वेळा जू ठेवण्याच्या जागेवर घट्ट अशा गाठी येतात व त्या वेदनादायी असतात. खांद्यावरील भागास जखम, बेंड, घट्ट गाठी झाल्यावर बैल काम करू शकत नाही. अशा प्रकारची खांदेदुखी जास्त काळ राहिली, उपचारास विलंब झाला, तर खांदेसुजीच्या जागी कर्करोग होण्याची शक्यखता असते. 

खांदेसुजीवर उपाय – खांदेसुजी जर प्राथमिक अवस्थेतील असेल व सूज ही ताजी असेल, तर त्यास थंड पाण्याने शेकावे (15 अंश से.), हा शेक चार ते पाच मिनिटे द्यावा, तसेच या सुजेवर पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने शिफारशीत मलम लावावे. बैलास पूर्णतः आराम द्यावा. ही सूज कमी होत नसेल, जखम किंवा गाठी असतील, तर बऱ्याच वेळा शस्त्रक्रिया करावी लागते, यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी. आपले बैल शक्य तो समान उंचीचे असावेत. जूचा खांद्यावर टेकणारा भाग मऊ व गुळगुळीत असावा. बैलांना कामास जुंपल्यावर दोन्ही बाजूस समान वजन असावे. बैलांना एकाच दिवशी भरपूर काम न देता थोडे थोडे काम द्यावे, मध्येच थोडी विश्रांती द्यावी.

डॉ.यादव
स्त्रोत : विकासपिडीया.

krushikingadmin

Read Previous

ऊस सल्ला: पोक्का बोईंग नियंत्रण उपाय

Read Next

स्वातंत्र्यानंतरचे वनविषयक कायदे