सफरचंद उत्पादकांना अच्छे दिन येणार

कृषिकिंग दिल्ली : भारताने अमेरिकेतून आयात होणाऱ्या सफरचंदावरील आयातशुल्क वाढविल्यामुळे आयात कमी होऊन स्थानिक बाजारपेठेत सफरचंदाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. भारतात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सफरचंदाचे पीक चांगले असल्यामुळे उत्पादनात वाढ अपेक्षित आहे.
अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापारयुध्द सुरू झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारताने अमेरिकेतून आयात होणाऱ्या सफरचंदांवरील आयातशुल्क 20 टक्क्यांनी वाढवून ते 70 टक्क्यावर नेले आहे. त्यामुळे अमेरिकेतून येणारे सफरचंद महाग होणार आहेत. त्याचा परिणाम म्हणून ग्राहक अमेरिकी सफरचंदांऐवजी भारतीय सफरचंदांकडे मोर्चा वळवतील किंवा मग भारताच्या बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी अमेरिकेतील निर्यातदारांना आपल्या नफ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी करावे लागेल, असे मत बाजारविश्लेषकांनी व्यक्त केले.
भारताला सफरचंदांची निर्यात करण्यात अमेरिकेचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. भारताच्या एकूण सफरचंद आयातीत अमेरिकेचा वाटा 30 ते 40 टक्क्यांच्या घरात आहे. अमेरिका-भारत व्यापारयुध्दामुळे अमेरिकेच्या तुलनेत चीली, पोलंड, सरबेरिया आणि टर्की या देशांतून  भारतात सफरचंदांची आयात वाढण्याची शक्यता आहे. चीनमधूनही पुन्हा सफरचंद आयात सुरू होणार असल्याचीही चर्चा आहे. क्वारन्टाईनच्या मु्द्यावरून भारताने 2017 मध्ये चीनमधील सफरचंद आयातीवर बंदी घातली होती. ही बंदी उठवण्यासाठी सध्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत.
भारतात प्रामुख्याने जम्मू आणि काश्मिर व हिमाचल प्रदेश या दोन राज्यांत सफरचंदांचे उत्पादन घेतले जाते. गेल्या हंगामात (2018) प्रतिकूल हवामानामुळे तिथे सफरचंदांच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. यंदा मात्र हवामान अनुकूल असल्याने उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. जूलैच्या शेवटच्या आठवड्यात सफरचंदांची काढणी सुरू होते. अमेरिकेतून सफरचंदांची आयात कमी होणार असल्यामुळे भारतातील स्थानिक सफरचंद उत्पादकांच्या दृष्टीने यंदाचा हंगाम चांगला राहण्याची चिन्हे आहेत.  

krushikingadmin

Read Previous

ज्ञानेश्वर महाराज पालखीः संभाजी भिडे, शिवप्रतिष्ठान कार्यकर्त्यांना पालखीच्या पुढे चालण्यास परवानगी नाही

Read Next

हवामान अनुकूल वाणांच्या बिजोत्पादनावर भर