बुधवारपासून पाऊस आठवडाभर विश्रांती घेणार?

कृषिकिंग : राज्यात गेल्या दोन दिवसांत मराठवाड्यासह सर्वदूर चांगला पाऊस झालेला असला तरी बुधवार (ता. 26) पासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. त्यानंतर किमान आठवडाभर पावसाचा खंड राहील. त्यानंतर पुन्हा चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे, असे पुणे वेधशाळेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, संपूर्ण देशाचा विचार करता जून महिन्यात पाऊस सरासरी गाठण्याची शक्यता नाही. यंदा मॉन्सूनचे आगमन उशीरा झाले आणि त्यानंतर वायू चक्रीवादळाचा फटका बसला. त्यामुळे जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले.

जून महिना संपायला आठवडाभराचा कालावधी शिल्लक असताना पावसात 38 टक्के तूट आहे. उरलेल्या दिवसांत खूपच नाट्यमयरित्या जोरदार पाऊस झाला तरच ही तूट भरून निघू शकते. तशी शक्यता कमी असल्याच तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे यंदा जून महिन्यातील पावसाची तूट गेल्या सात वर्षांतील निच्चांकी राहील, असे एकंदर चित्र आहे. देशात 2014 मध्ये जून महिन्यात सरासरीच्या 42 टक्के कमी पाऊस झाला होता. यंदा हा विक्रम मोडीत निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2012 मध्ये जून महिन्यात 28 टक्के पाऊस तूट नोंदविण्यात आली होती. यंदा याआधीच हे प्रमाण ओलांडले गेले आहे. यंदा पूर्वमोसमी पावसाचे घटलेले प्रमाण आणि जून मधील पावसाची तूट यामुळे देशभरात पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. त्याचा परिणाम खरीप पेरणीवर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात तर जमीन पूर्ण कोरडी असल्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध असेल तरच आता पेरण्या कराव्यात, अन्यथा चांगला पाऊस होईपर्यंत वाट पाहावी, असा सल्ला कृषी हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

krushikingadmin

Read Previous

पारितोषिक विजेत्या शेतकरयाची यशोगाथा , सिक्कीम

Read Next

ज्ञानेश्वर महाराज पालखीः संभाजी भिडे, शिवप्रतिष्ठान कार्यकर्त्यांना पालखीच्या पुढे चालण्यास परवानगी नाही