गाभण काळात गाई, म्हशींना सांभाळा : भाग ०२

व्याल्यानंतर घ्यावयाची काळजी

 • व्याल्यानंतर गाई, म्हशीचे अंग कोरडे करावे. जंतूनाशक वापरून अंग स्वच्छ करावे.
 • गाई, म्हशींना प्यायला थोडं कोमट पाणी द्यावे.
 • वार दूरवर नेऊन खड्यात पुरावी.
 • जर वार अडकली तर पशुवैद्यकाला बोलावून योग्य उपचार करून घ्यावेत.
 • व्याल्यानंतर ताबडतोब गाय, म्हैस आपल्या वासराला चाटते; त्याला चाटू द्यावे.
 • वासराला गाई, म्हशीने चाटले नाही तर कोरडा कपडा किंवा पोत्याने वासराला चोळून कोरडे करावे.
 • जन्मल्याबरोबर वासराच्या नाका-तोंडातून कफ काढून टाकावा.
 • वासराची नाळ 2 ते 5 सें.मी. दूरवर बांधून त्यापुढे कापावी. त्यावर टींचर आयोडिन लावावे.
 • गोठा स्वच्छ करावा. चांगले वाळलेले गवत पसरावे.
 • वासरू कमजोर असल्यास त्याला उभे राहण्यास आणि दूध पिण्यास मदत करावे.
 • व्याल्यानंतर दूध उत्पादनासाठी गाई, म्हशीला मुबलक आहार द्यावा. आहारात गव्हाचा कोंडा, ओट तसेच अळशीच्या बियांचा समावेश असावा. व्याल्यानंतर ताजा हिरवा चारा द्यावा. स्वच्छ मुबलक पाणी पाजावे.

वासराला चीक पाजा…

गाय, म्हैस विल्यानंतरच्या पहिल्या दुधाला आपण चीक म्हणतो. हा चीक वासराच्या आरोग्यासाठी अत्यावश्‍यक असतो. त्यापासून वासराला रोगप्रतिकारशक्ती मिळते.

चिकामध्ये प्रथिने, पिष्टमय पदार्थ आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे घटक मुबलक प्रमाणात असतात.

वासरांना होणारे आजार

हगवण लागणे –
1) हा आजार विशेष करून नवजात वासरांमध्ये आढळून येतो. साधारणतः जन्मल्यानंतर काही दिवसांत ते दोन महिने या कालावधीत हा आजार दिसतो.
2) या आजारामुळे शौचावाटे पाणी निघून जाते आणि शरीरातील जलांश कमी होतो. आजारी वासरे ताप, पातळ संडास आणि अशक्तपणा अशी लक्षणे दाखवतात. वासरे अगदी मलूल होतात, नुसती पडून राहतात.
3) या आजाराच्या प्रतिबंधासाठी सर्वांत महत्त्वाची उपाययोजना म्हणजे वासरांना वेळीच चीक पाजावा. चिकामध्ये असणाऱ्या घटकांमुळे वासरांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. वासरू जन्मल्यानंतर तीन ते चार दिवस त्यांना योग्य प्रमाणामध्ये चीक पाजावा.

न्यूमोनिया –
1) या आजाराची लक्षणे म्हणजे ताप येणे, नाकामधून द्रवपदार्थ येणे, श्‍वास घेण्यास त्रास होणे, वासरांना ढास लागणे आणि अशक्तपणा.
2) योग्य वेळी उपचार केला नाही, तर वासरास मृत्यू येतो. या रोगाच्या उपचारासाठी पशुवैद्याच्या सल्ल्याने प्रतिजैविकांचा उपयोग आणि श्‍वासनलिकेतील अडथळा मोकळा करण्याची औषधे द्यावीत.
3) या रोगाच्या प्रतिबंधासाठी वासरांचा थंडी व खूप वाऱ्यापासून बचाव करावा, गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी. गोठ्यामध्ये ओलावा किंवा दमटपणा राहणार नाही याची काळजी घ्यावी.

गोल कृमींचे संक्रमण
1) गोल कृमींच्या संक्रमणामुळे वासरांची वाढ खुंटते, क्वचितप्रसंगी वासराचा मृत्यूही संभवतो. या जंतांचा प्रसार हा मातेकडून वासरांना गर्भावस्थेमध्ये असतानाच होतो. हे जंत वासरांच्या आतड्यांमध्ये असतात व आतड्यांमधून पाचक रसाचे शोषण करतात.
2) बऱ्याच वेळा हे जंत वासरांच्या यकृतामध्ये जाऊन त्या ठिकाणचे कार्य बिघडवतात. जंतांच्या प्रादुर्भावामुळे वासरे अशक्त होतात, त्यांच्यामध्ये रक्ताची कमतरता जाणवते.
3) वासरांच्या शेणाची तपासणी करून जंतांचे निदान करता येते. यावर उपाय म्हणजे जंतनाशक औषधींचा वापर करावा. जंतांच्या प्रतिबंधासाठी जनावरांची, तसेच गोठ्याची स्वच्छता ठेवावी.

स्त्रोत – विकासपीडीया

Read Previous

तूर : बाजारभाव विश्लेषण

Read Next

उसाला प्रतिक्विंटल ३० रुपये अनुदान द्या, उत्तर प्रदेशात साखर कारखान्याची मागणी