गुऱ्हाळाला ऊस देण्यास शेतकऱ्यांची पसंती

नांदूर : दौंड तालुक्‍यात गूळनिर्मितीसाठी गुऱ्हाळघरावर गाळप होत असलेल्या उसास प्रतिटन सुमारे 2 हजार 600 रुपये भाव मिळत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये गुऱ्हाळासाठी देण्यात येणाऱ्या उसाला प्रतिटन 2 हाजार 200 रुपये मिळत होते, यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला ऊस साखर कारखान्यास दिला होता. मात्र, परिसरातील बहुतांश साखर कारखान्यांनी पहिली उचल म्हणून 2400 रुपये दिल्यामुळे शेतकरी नाराज आहेत. जीवापाड जपलेल्या शेतमालाचे गुऱ्हाळांमुळे चिज होत असल्याने शेतकरी कृतज्ञता व्यक्त करीत आहेत.

यंदाच्या हंगामामध्ये गुऱ्हाळघरावर गूळ निर्मितीसाठी गाळप करण्यात येत असलेल्या उसास मागणी वाढत आहे.
सध्या गुळाच्या बाजारभावामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने आगामी काळामध्ये उसाचा प्रतिटन दर हा सुमारे तीन हजारांच्या आसपास पोहचण्याची शक्‍यता आहे. गूळ सध्या 3300 रुपये क्विंटलच्या आसपास विकला जात आहे असून, सरासरी गूळ उताराही वाढत आहे.

ऊस उत्पादकांच्या अपेक्षित उत्पन्नावर पाणी
ऊस पिकाला पाण्याची आवश्‍यकता जास्त असते, त्यातच पिकाचा एकरी व्यवस्थापन खर्चही वाढला आहे. मशागतीचा खर्च, उसाचे बेणे, खताच्या वाढलेल्या किमती, मजुरीचे वाढलेले दर याचा विचार करता सध्या मिळत असलेला भाव समाधानकारक आहे. मात्र, जास्तही नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. पिकाला पाण्याचे आर्वतन देत असताना अनेकांनी ठिंबक सिंचन, कमी पाण्यामध्ये योग्य नियोजन केल्यामुळे एकरी उत्पादन वाढविण्यास मदत झाली असली तरी पावसाअभावी एकरी अपेक्षित उत्पन मिळत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

कारखान्याच्या गळीत हंगामावर परिणाम
सध्या परीसरातील गुऱ्हाळघरावर मोठ्या प्रमाणावर गुळनिर्मितीसाठी उसाची तोडणी करण्यात येत असल्यामुळे आगामी साखर कारखान्याच्या गाळप हंगामावर यांचा चांगलाच परीणाम होणार आहे. कारखान्यापेक्षा उसाला चांगला दर मिळतो आहे, याचबरोबर पैसेही लवकर मिळत आहेत. कमी कालावधीमध्ये उसाचे होत असलेले गाळप शेतकऱ्यांना कांदा व गहू यासारखी तस्तम पिकेही घेता आली आहेत.

कारखान्याचा 2 हजार 400 भाव
दुष्काळी परीस्थिती तसेच तालुक्‍यामध्ये ऊस लागवडीचे कमी झालेले प्रमाण यामुळे एकीकडे साखर कारखान्यांना गाळपासाठी दिलेल्या ऊसाला 2 हजार 400 रुपये एवढाच दर मिळत आहे. जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने चालू गाळप हंगामामध्ये उसाची प्रतिटन पूर्ण रक्कम जाहीर केली नाही, त्यामुळे शेतकरी सध्या समाधानकारक दरामुळे गुऱ्हाळघरावर ऊस गाळपास पसंती देत आहेत.

Read Previous

तालुकास्तरावर शेतकरी मार्गदर्शन कक्ष स्थापन करणार – कृषीमंत्री

Read Next

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या