अतिरिक्त चार लाख टन मका आयात करणार

कृषिकिंग: भारताने मक्यावरील आयातशुल्क कमी करून आणखी चार लाख टन मका आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात मक्यावर अमेरिकी लष्करी अळीचा (फॉल आर्मी वॉर्म) प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनात मोठी घट अपेक्षित असल्याने आयात वाढविण्यात आली आहे. पण त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत मक्याचे दर घटणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.
केंद्र सरकारने जून महिन्यात एक लाख टन मका आयात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता आणखी चार लाख टन मका आयात करण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. पूर्वी मका आयातीवर 60 टक्के शूल्क होते. परंतु पोल्ट्री उद्योगाच्या आग्रही मागणीमुळे मका आयात करण्यास सरकारने परवानगी दिली. त्यासाठी मक्यावरील आयातशुल्क 60 वरून 15 टक्क्यांवर खाली आणले गेले.
मक्याचे उत्पादन घटल्यामुळे पशुखाद्य उद्योगाला गेल्या वर्षीपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे, पण आता अतिरिक्त मका आयातीला परवानगी मिळाल्यामुळे दर कमी होऊन दिलासा मिळेल, असे अनमोल फीड्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक अमित सराओगी यांनी सांगितले.
भारत हा जगातील सातव्या क्रमांकाचा मका उत्पादक देश आहे. एकेकाळी मक्याची निर्यात करणारा हा देश गेल्या काही वर्षांत घटलेले उत्पादन, पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाकडून वाढती मागणी यामुळे मका आयातदार देश बनला आहे. त्याचा फायदा ब्राझील, अर्जेन्टिना आणि अमेरिका या भारताच्या स्पर्धक देशांना झाला असून त्या देशांतून मक्याची निर्यात वाढली आहे. भारतात  कापूस वगळता जनुकीय बदल केलेल्या (जीएम) पिकांना परवानगी नसल्यामुळे बिगर जीएम मक्याचीच आयात करणे बंधनकारक आहे.

Read Previous

आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा

Read Next

‘ते’ बियाणे एचटीबीटी कापसाचेच