इ-नाम प्लॅटफॉर्मवर केवळ 14 टक्के शेतकऱ्यांची नोंदणी

कृषिकिंग: केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या नॅशन अॅग्रिकल्चर मार्केट (इ-नाम) या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर केवळ 14 टक्के शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे. तसेच नोंदणी केलेल्यांपैकी 50 टक्के शेतकऱ्यांना या प्लॅटफॉर्मचा काहीही उपयोग झालेला नाही.
इ-नाम हा देशव्यापी इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. केंद्र सरकारने 2016 मध्ये त्याची सु्रूवात केली. शेतकऱ्यांना आपला माल देशभरातल्या कोणत्याही बाजारपेठेत विकता यावा आणि त्यांना स्पर्धात्मक दर मिळावा, हा त्यामगचा हेतु होता. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, देशातील सुमारे 1.64 कोटी शेतकरी आणि सुमारे 1.24 लाख व्यापाऱ्यांची या प्लॅटफॉर्मवर नोंदणी झालेली आहे. त्यापैकी 80 लाख शेतकऱ्यांना या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतमालाची विक्री करून फायदा झाला आहे. एकूण नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता फायदा मिळालेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण 49 टक्के इतके भरते. 2011 च्या जनगणनेनुसार देशात शेती क्षेत्रात काम करत असलेल्या लोकांची संख्या सुमारे 26.31 कोटी आहे. त्यात 11.89 कोटी लोक शेतकरी आहेत, तर 14.43 कोटी लोक मजूर आहेत. परंतु यातले बहुतांशी लोक इ-नाम या प्लॅटफॉर्मपासून लांबच आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून दिली जाणारी सर्व माहिती आणि सेवा या प्लॅटफॉर्मवर एक खिडकी सुविधा स्वरूपात पुरवल्या जातात. त्यामध्ये शेतमालाची आवक, गुणवत्ता, किंमत, खरेदी आणि विक्रीच्या ऑफर्स, इ-पेमेंट आदींचा समावेश आहे. शेतकरी मोबाईल फोनच्या माध्यमातून हा प्लॅटफॉर्म वापरू शकतात.

Read Previous

कृषी क्षेत्रातील क्रांती

Read Next

मराठा आरक्षणाला स्थगिती नाही