यंदा खरीप कर्जवाटप केवळ 30 टक्के

कृषिकिंग: खरीप पिककर्ज वाटपाच्या बाबतीत राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंकांची उदासीनता यंदाही कायम आहे. यंदा खरीप पिककर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅकांनी उद्दीष्टाच्या केवळ 17 टक्के कर्जवाटप केले आहे. तर व्यापारी बॅंकांनी 18 टक्के उद्दीष्ट पूर्ण केले आहे. त्या तुलनेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी कर्जवाटपात आघाडी घेतली असून त्यांनी उद्दीष्टाच्या 58 टक्के कर्जवाटप पूर्ण केले आहे. संपूर्ण राज्याचा विचार करता यंदा आतापर्यंत केवळ 30 टक्के पिककर्ज वाटप झाले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जवाटपात कुचराई करणाऱ्या बॅंकांवर कारवाई करण्याचा इशारा देऊनही कर्जवाटपाची स्थिती वाईट आहे. मराठवाडा, विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये तर अत्यंत तुटपुंजे कर्जवाटप करण्यात आले आहे.

यंदाच्या वर्षी 59 हजार 766 कोटी रूपये पिककर्ज वाटपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यात खरीप हंगामासाठी 43 हजार 844 कोटी रुपये तर रब्बी हंगामासाठी 15 हजार 922 कोटी रुपये अशी विभागणी आहे. बँकांनी शेतकऱ्यांना जलदगतीने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत दिल्या होत्या. तसेच कर्जवाटपात दिरंगाई करणाऱ्या बॅंकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र याचा फारसा उपयोग झाला नाही. आतापर्य़ंत केवळ 12 हजार 972 कोटी रूपयांचे कर्ज वाटप झाले आहे. एकूण उद्दीष्टाच्या केवळ 30 टक्के इतके हे प्रमाण आहे.गेल्या वर्षी खरीप व रब्बी हंगाम मिळून 58 हजार 331 कोटी रूपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते. प्रत्यक्षात केवळ 54 टक्के उद्दीष्ट साध्य झाले. केवळ 31 हजार 282 कोटी रूपयांची कर्जे देण्यात आली.

Read Previous

राज्यात पिकविम्याचे प्रमाण घटले

Read Next

बिगर बासमती भाताची निर्यात घटणार