पीक सल्ला: डाळिंबावरील फुलकिडीची ओळख आणि व्यवस्थापन

कृषिकिंग: जीवनक्रम: पूर्ण वाढ झालेली मादी पानाच्या खालच्या भागातील पेशीमध्ये ३० ते ५० अंडी देते. त्यातून २ ते ५ दिवसांत पिल्ले बाहेर पडून ५ ते ७ दिवसांत प्रौढ बनतात. पूर्ण वाढ झालेले फुलकिडे १० ते १५ दिवस जगतात. या किडीच्या एका वर्षात ३ ते ४ पिढ्या पूर्ण होतात.

नुकसान: डाळिंबावरील फुलकिडीच्या पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या अशा दोन प्रजाती आहेत. पिल्ले आणि प्रौढ किडे पानांवरील, कोवळ्या फांद्यांवरील पृष्ठभाग खरवडून त्यातून स्रवणाऱ्या रसावर उपजीविका करतात. त्यामुळे झाडांची कोवळी पाने वेडेवाकडे व गुंडाळलेले आढळतात. तसेच फळांवर ओरखडल्या सारखे व गंजल्यासारखे खडबडीत चट्टे पडतात. अशा फळांना बाजारभाव कमी मिळतो.

नियंत्रण: प्रादुर्भाची लक्षणे दिसता क्षणी थायोमिथोक्झाम २५ डब्लू. जी (०. ३ ग्रॅम/लि )किंवा असेटामिप्रीड ७५ एस. पी. (१ग्रॅम/लि) चि फवारणी पालवी ते फळ तोडणीपर्यंतच्या कालावधी मध्ये करावी. प्रादुर्भाव झालेली कोवळी पाने नेहमी नष्ट करावीत. फुलकिडे मिरची, कांदा, लसुन, व टोमाटो या पिकांवर देखील उपजीविका करत असल्यामुळे डाळींबामध्ये यासारखी आंतरपिके घेऊ नयेत.

प्रा. सागर तराटे, कृषी कीटकशास्त्र,
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण(सातारा).

Read Previous

“शेतकरी…हाच जगाचा पोशिंदा’’ भाग – ११ (१४)

Read Next

जनावरांसाठी आरोग्यदायी औषधी वनस्पती; अफू व ओवा