कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ११ हजार कोटींचा फटका

कृषिकिंग : राज्याभरात मॉन्सूनोत्तर पावसामुळे सर्वांत मोठे पीक असलेल्या कापसाचे सुमारे ४५ टक्‍के क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. घटलेली उत्पादकता, वाढलेला उत्पादन खर्च आणि पिकांच्या झालेेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना सुमारे ११ हजार कोटींच्या वर थेट फटका बसला आहे.

गेल्या वर्षीच्या कापूस दरातील सुधारणांमुळे शेतकऱ्यांनी यंदा लागवड क्षेत्र वाढविले होते. गेल्या वर्षी कापसाला शेवटच्या टप्प्यात सहा हजार रुपये प्रति क्‍विंटलपर्यंतचा दर मिळाला. या वेळी देखील कापूस खऱ्या अर्थाने नगदी पीक ठरेल, असा विश्‍वास होता. त्यामुळेच गेल्या वर्षीच्या ३९ लाख हेक्‍टरवर क्षेत्रावरून या वर्षी राज्यात ४४ लाख हेक्‍टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली.

परंतु मॉन्सूनोत्तर पावसाने पुरती दाणादाण उडाली. पावसाचा मारा झाल्याने बोंडे सडली; काही ठिकाणी नख्यात असलेला कापूस ओला झाल्याने त्याची प्रत खालावली तर काही ठिकाणी कापूसदेखील काळवंडल्याने त्याला खरेदीदारदेखील उरला नाही. स्टेंपल लेंथ (तंतूची लांबी) हा घटक कापसाच्या विक्रीत महत्त्वाचा असतो; परंतु पावसामुळे अपेक्षित स्टेंपल लेंथ मिळणार नाही.

दृष्टिक्षेपात राज्यातील कापूस नुकसान

  •     एकूण लागवड : ४४ लाख हेक्‍टर
  •     सरासरी उत्पादकता : ४ क्‍विंटल
  •     एकूण उत्पन्न प्रति एकर (बाजारभावाप्रमाणे) : १९२०० रुपये
  •     या वर्षी उत्पादन खर्च प्रति एकर : २५ हजार रुपये.
  •     बाधित पीक टक्के : ४५ टक्के
  •      सध्याचा बाजारभाव : ४८०० रुपये प्रति क्विंटल
  •     हमीभाव दर : ५५५० रुपये प्रति क्विंटल

…असे झाले नुकसान

  •   सततच्या पावसाने बोंडे कुजली; काळी पडली
  •   बोंडांची मोठी गळ; कापसाची प्रत खालावली
  •   मुळे कुजली; अन्नक्रिया ठप्प
  •   झाडावर लाल्या विकृती आणि मर वाढली
  •   बुरशीजन्य रोग वाढले; फवारणी खर्चात तिप्पट वाढ
  •   खतांचा डोस वाढला; मजुरी खर्चात वाढ
  •   पत्ती वाढल्याने हंगाम एक महिना लांबला
  •   उत्पादकतेत मोठी घट; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
Read Previous

तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल – पृथ्वीराज चव्हाण

Read Next

कांदा भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार पाच हजार टन कांदा आयात करणार