पणन महासंघाच्या कापूस खरेदीला २७ चा मुहूर्त

कृषिकिंग : पणन महासंघ स्वतंत्र कापूस खरेदी न करता सीसीआयकरिता एजंट म्हणून खरेदी करतो. त्यामुळे निकृष्ट कापूस खरेदीनंतर त्यापासून तयार गाठींची उचलच सीसीआयने केली नाही तर मग काय, असा प्रश्‍न पणन महासंघासमोर होता. या साऱ्या मुद्यांवर विचार करून त्यानंतर बुधवारपासून २७तारखेपासून पणन महासंघाने खरेदी केंद्र उघडण्याचे ठरवले आहे.

त्यामुळे सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन महासंघाची खरेदी २७तारखेपासून सुरु करण्याच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. महासंघाकडून राज्यात टप्प्याटप्प्याने तब्बल ४२ खरेदी केंद्रे उघडण्यात येणार असून ती यादीदेखील अंतिम झाली आहे. अमरावती येथील सहकारी जिनिंग परिसरात काटापूजनाने खरेदीची सुरुवात केली जाणार आहे.

कापसात आठ टक्‍क्‍यापर्यंत आर्द्रता असेल तरच हमीभाव दिला जाणार आहे. त्यानंतर प्रती टक्क्‍यानुसार प्रती किलोची किंमत कमी होईल. बारा टक्‍क्‍यांपर्यंत आर्दता असेल तर चार किलोचे हमीभावानुसार पैसे कमी केले जाणार असल्याचे पणनच्या सूत्रांनी सांगितले. कापसाचा हमीभाव ५५५० रुपये असून आर्द्रतेचा विचार करूनच शेतकऱ्यांना पैसे दिले जातील.

Read Previous

वाढीव मदतीसाठी राज्यपालांना भेटणार – अजित पवार

Read Next

पणन महामंडळाच्या कापूस खरेदीची हि असतील केंद्रे