कर्जमाफी तक्रारनिवारणासाठी समित्या स्थापन

कृषिकिंग: राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीतील घोळ आणि तोंडावर आलेली विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन कर्जमाफीतील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहायक निबंधकांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीत पाच सदस्यांचा समावेश असेल. या समितीने अपात्र शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी दर आठवड्याला बैठक घेऊन, कर्जमाफी मिळण्यासाठी मदत करण्याचे आदेश सहकार विभागाने काढले आहेत.
कर्जमाफी योजनेत खात्यांची अपुरी माहिती, चुकीची माहिती शेतकरी किंवा सुविधा केंद्र आणि शासनाच्या व्यक्तींकडून झाली असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. यामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले. तर या योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना बॅंकांकडून कर्जपुरवठा होत नसल्याच्या देखील तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. या सर्व तक्रारींचा निपटारा करत, पात्र सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ आणि पुन्हा कर्ज मिळण्यासाठी तालुका निबंधकाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्हा बॅंकेचा तालुका प्रतिनिधी, अग्रणी बॅंकेचा तालुका प्रतिनिधी, लेथा परिक्षक आणि सहकार विभागाच्या उच्चश्रेणीच्या अधिकारी सदस्य सचिव असणार आहे. या समितीने प्रत्येक आठवड्याला बैठक घेऊन, अपात्र आणि तक्रारदार शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करणे अपेक्षित आहे.

Read Previous

“शेतकरी…हाच जगाचा पोशिंदा’’-भाग – ७ (१४)

Read Next

झिरो बजेट शेतीवर विजय जावंधियांची टीका