हिवाळ्यात शेळ्या-मेंढ्यात होणारे आजार व घ्यावयाची काळजी


शेळी -मेंढीपालन व्यवसायामध्ये जसे संगोपन व व्यवस्थापन याला महत्व आहे. तसेच शेळ्यांचे आरोग्य सुध्दा तितकेच महत्वाचे आहे. जेथे शेळी-मेंढीपालन हा एक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात केले जातो, तेथे कळपातील जनावरांना वेगवेगळ्या ऋतूत साथीच्या व इतर रोगांची लागण होऊन शेळ्या-मेंढ्यांच्या मृत्यूमुळे फार मोठे आर्थिक नुकसान होवू शकते. शेळी-मेंढीपालन व्यवसायिकांना शेळ्या-मेंढ्यांना होणारे रोग, त्याची लक्षणे तसेच उपचार व प्रतिबंधात्मक उपाय माहित असल्यास मरतुकीवर नियंत्रण ठेवता येईल व मिळणा-या उत्पन्नात चांगली वाढ होईल. हिवाळ्यामध्ये शेळ्या-मेंढ्यांना प्रामुख्याने आंत्र विषरक्तता (ET), संसर्गजन्य,न्युमोनिया , मवा   (Contageous ECthyma) फुट रॉट , सांसर्गिक गर्भपात , बाह्यकृमी , करडांची हगवण , इनफेकशस केऱ्याटायटीस (पिंक आय) असे विविध प्रकारचे आजार होतात. आता आपण प्रत्येक आजाराची लक्षणे व त्याची घ्यावयाची काळजी समजून घेऊया.

अांत्र विषरक्तता

या रोगास एन्ट्रोटॉक्सीमिया व काही ठिकाणी भूल देखील म्हणतात. हा आजार विषाणूमुळे (Clastradium pusfringens type C’ and ‘D’) होतो. अचानक खाण्यात होणा-या बदलामुळे किंवा तणावामुळे हा रोग उद्भवतो.

लक्षणे

शेळीचे पोट दुखते यामुळे शेळी वारंवार उट-बस करते. कृचितप्रसंगी धनुष्याकृती होतो व कधी कधी हगवण देखील सुरू होते. या आजाराची रोगबाधा ही प्रमुख तीन ठळक स्वरूपात आळलून येते.

  1. अतितीव्र स्वरूप : सामान्यत: करडात आढळून येते. रोगाचा कालावधी हा २४ तासापेक्षा देखील कमी असतो आणि पुष्कळदा लक्षात देखील येत नाही व ते दगावते.
  2. तीव्र स्वरूप : सामान्यत: लक्षणे ही सारख्याच स्वरूपाची आढळतात, परंतू तिव्रता कमी असते. रोगाचा कालावधी हा ३ ते ४ दिवसांचा असतो. उपचाराअभावी काही जनावरे मरण पावतात. रोगबाधा साधारणत: प्रौढ जनावरांत आढळून येते. रोगबाधेचा लसीकरण झालेल्या शेळ्या-मेंढ्यांच्या कळपातदेखील आढळून येतो.
  3. दिर्घकालीन बाधा : वारंवार कळपातील शेळ्या-मेंढ्या आजारी पडताना आढळतात. साधारणत: प्रौढ शेळ्या बळी पडतात. आजारी शेळ्या मलून मरणासन्न दिसतात. हगवण वारंवार होत असल्याने शेळ्या-मेंढ्यांच्या वजनात घट होते. हा आजार टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे रोगप्रतिबंधक उपाय व काळजी घेतली पाहिजे.

करडू ४ ते ६ आठवड्याचे झाल्यावर लसीची पहिली मात्रा टोचून घ्यावी. बुस्टर लस १५ दिवसांनी लावावी व त्यानंतर ६ महिन्यांनी लसीकरण आवश्य करून घ्यावे. कळपात रोगबाधेची नोंद झाली असल्यास लसीकरण दर ४ महिन्यांनी करून घ्यावे.

फार्मवर नवीन शेळ्या आढळल्यास त्यांना विनाविलंब लसीकरण करुन घ्यावे. त्यानंतरच शेळ्या कळपात सोडाव्यात. शक्यतो लसीकरण कार्यक्रम असा आयाजित करावा की शेळ्या-मेंढ्या विण्यापूर्वी २ ते ३ आठवडे लस टोचणीची वेळ राहील, जेणेकरून नवजात पिल्ल्यांना आईकडून रोगप्रतिकारशक्ती प्राप्त होईल.

शेळ्या-मेंढ्यात होणारा दुसरा महत्वाचा आजार म्हणजे मवा (Contageous Ecthyma) होय. हा एक विषाणूमुळे होणारा सांसर्गिक रोग आहे. रोगाचा प्रसार शेळ्या-मेंढ्यांच्या कळपात अतिशय झपाट्याने होत असतो. रोगप्रसारात पिडीत जनावरांचा संपर्क अथवा प्रक्षेत्रावरील अवजारे मदत करतात. या रोगाची विशिष्ट लक्षणे म्हणजे शेळ्या-मेंढ्यांच्या त्वचेवर पिटिका आणि पुटिका आढळतात. कृचितप्रसंगी नाकपुड्या व डोळ्यात देखील दिसतात. त्यानंतर याचे रुपांतर पुटिकांत होते व त्यावर जाड खपली धरली जाते. आजारी कोकरांना दूध ओढता येत नाही व चारा देखील खाता येत नाही. खाता न आल्याने अशी कोकरे व शेळ्या-मेंढ्या झपाट्याने कमजोर होतात व वजनात घट होते.

हा आजार झाल्यास लागण झालल्या शेळ्या-मेंढ्या (ICCO) कळपातून वेगळ्या कराव्यात व इतर आजारी जनावरांचा उपचार सुरू करावा, जेणेकरून कळपातील इतर निरोगी शेळ्या-मेंढ्यांना या रोगाची लागण होणार नाही.

Read Previous

शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १ लाख रुपये मदत द्यावी

Read Next

विमा कंपन्या विरोधात सेना आक्रमक