पंचनाम्यासाठी २० लाख शेतकऱ्यांचे अर्ज : कृषी आयुक्त

कृषिकिंग : परतीच्या मान्सून मुळे राज्यभरात अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकार कडून राज्यभरात पंचनामे सुरु केले आहेत. राज्यात अतिपावसानंतर आत्तापर्यंत २० लाख विमाधारक शेतकऱ्यांनी पंचनामा करण्यासाठी अर्ज केले आहेत, अशी माहिती कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी दिली आहे.  

“पावसामुळे राज्यभरात ५४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परंतु पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच निश्चित आकडा हाती येईल. सरकारकडून पंचनाम्यासाठी सात नोव्हेंबरची अंतिम मुदत देत आम्ही सर्व यंत्रणा पंचनाम्यासाठी कामाला लावली असली तरी सतत पाऊस आणि बांधापर्यंत पोचण्यात अडचणी आहेत. त्यामुळे काम लांबले जाऊ शकते. तरीही कृषी विभागाने इतर कामे बाजूला सारून आमचे सर्व कृषी सहायक, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी व राज्यातील सर्व यंत्रणा या कामाला जुंपली आहे,” असे देखील कृषी आयुक्त म्हणाले.   

राज्यात सर्वात जास्त नुकसान औरंगाबाद व लातूर भागात झाले आहे. राज्यात आतापर्यंत काही भागात ३० ते ७० टक्के पंचनाम्याचे काम झालेले आहे. मुळात अतिपावसामुळे शेतात जाण्यास रस्ते उपलब्ध नाहीत. त्यामुळे पंचनाम्याची कामे जलदपणे करण्यात सर्वच यंत्रणेला अडचणी येत आहेत. असे देखील आयुक्तांनी सांगितले.

Read Previous

मुख्यमंत्री फडणवीस यांचा राजीनामा

Read Next

पशुप्रजननासाठी खनिजद्रव्ये