पावसामुळे दुध उत्पादन वाढण्याची शक्यता

कृषिकिंग: मॉन्सूनच्या पावसाने पुन्हा जोर धरल्यामुळे देशातील दुध उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा आहे. जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे दुध उत्पादन 10 टक्के घटले होते. जुलै मधील पावसामुळे स्थिती सुधारली आहे. तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 99 टक्के पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे दुधाच्या टंचाईची भीती संपुष्टात आल्याचे मानले जात आहे.

महाराष्ट्रात दुध खरेदीत वाढ झाली असून ग्राहक आणि शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे, असे मत अमूल चे व्यवस्थापकीय संचालक आर.एस.सोधी यांनी व्यक्त केले. चांगल्या पावसामुळे दुधाचे दर स्थिर राहतील, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांत दुधाचा पुष्टकाळ सुरू झाला असून त्यामुळे दुधाचा पुरवठा वाढेल आणि किंमती स्थिर राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

लॅक्टॅलिस इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राहुल कुमार यांनी सांगितले की, जुलै महिन्यात दुध उत्पादन वाढण्यास सुरूवात झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊस कमीच राहिला असता तर दुधाच्या किंमती वाढविण्याखेरीज पर्याय राहिला नसता, असे ते म्हणाले.

पाऊस चांगला असल्याने पशुखाद्याच्या किंमतीही कमी होण्यास सुरूवात होईल, असे डेअरी क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. यंदा मॉन्सून उशीरा आल्याने आणि नंतर त्याची वाटचाल रखडल्यामुळे सुरूवातीच्या टप्प्यात पाऊस कमी झाला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत दुध खरेदी घटली होती. दुधाच्या टंचाईमुळे डेअरी कंपन्यांनी अलिकडच्या काळात दुध खरेदी दरात सुमारे 20 टक्के वाढ केली होती. पण जुलैमध्ये पावसाचे पुनरागमन झाल्यामुळे दुध उत्पादनाची स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे.

Read Previous

आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा

Read Next

तूर लागवडीत 14 टक्के घट