हवामान बदलाच्या अभ्यासासाठी राज्य सरकार स्थापणार टास्क फोर्स

कृषिकिंग : बदलत्या हवामानाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून त्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर यासोबत आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नियामक मंडळाची स्थापना करण्याचा देखील निर्णय घेतला गेला आहे. आरोग्यमंत्री या नियामक मंडळाचे अध्यक्ष असतील आरोग्य विभागाचे प्रधान सचिव त्याचे उपाध्यक्ष असणार आहेत. संचालक आरोग्य सदस्य सचिव असून राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागीय संचालक सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत

राज्यस्तरीय नियामक मंडळाची बैठक वर्षातून एक वेळा घेण्यात येईल. तर टास्क फोर्सची बैठक वर्षातून तीन वेळा घेण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी सदस्य सचिव असून जिल्हा सर्वेक्षण अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे सदस्य, जिल्हा कृषी अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रतिनिधी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रतिनिधी, जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टास्क फोर्समार्फत हवामान बदलाचा आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून राज्याचा कृती आराखडा तयार करण्यात येईल. या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य आणि जिल्हा टास्क फोर्सवर असणार आहे. त्यामध्ये हवामान बदलामुळे होणारे आजार ओळखणे, त्यांचे सर्वेक्षण करून जोखीम निश्चित करणे, जोखीमग्रस्त भाग व लोकसंख्या निश्चित करून त्यानुसार कार्ययोजना आखणे, उपलब्ध संसाधनांची यादी करणे आदी बाबी टास्क फोर्स करणार आहे, असे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Read Previous

उस उत्पादन घटल्याने यंदा राज्यात ५० हून अधिक कारखाने बंद राहण्याची शक्यता

Read Next

लिंबूवर्गीय पीक सल्ला: फळे काढणी व टिकवण