सिंचनामुळे मॉन्सूनला उशीर?

कृषिकिंग: भारतात सिंचनामुळे मॉन्सूनला उशीर होत असल्याची आणि पावसाचे प्रमाण कमी होत असल्याची शक्यता एका संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. वातावरणातील बदल, जागतिक तापमानवाढ या विषयावर संयुक्त राष्ट्रांनी नेमलेल्या इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी)ने यासंबंधीचा एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार भारतात मॉन्सूनचे आगमन होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर सिंचन केले जाते. शेतजमिनींना पाणी दिले जाते. त्यामुळे जमिनीचे तापमान कमी होऊन त्या थंड होतात. त्याचा परिणाम म्हणून जमीन आणि समुद्राच्या तापमानातील तफावत कमी होते. त्यामुळे मॉन्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती निर्माण होण्यात अडथळे येतात. मॉन्सूनचे आगमन लांबते आणि पावसाची तीव्रताही कमी होते, असे या अहवालात म्हटले आहे. परंतु या घटकाचा परिणाम हा व्यापक असतो. त्यामुळे सिंचनामुळे भारतातील पाऊसमान कमी होत असले तरी त्याचा आणखी एक परिणाम म्हणजे आफ्रिकेतील काही भागांत मात्र यामुळे पावसात वाढ होते. भारतातील जमिनींचे तापमान कमी झाल्याचा परिणाम म्हणून आफ्रिकेतील काही भागांत पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आल्याचे या अहवालात नमूद केले आहे. भारतात गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ, अतिवृष्टी, पावसाचे बदललेले वेळापत्रक यामुळे अनेक उलथापालथी झाल्या असून हे सर्व वातावरणातील बदलाचे निदर्शक आहेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. येत्या काळात वातावरणातील बदलाशी जुळवून घेण्यासाठी शेती पध्दतीत अनेक बदल करणे आवश्यक आहे, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

Read Previous

कृषी निर्यायीत मोठी घट

Read Next

महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 17 ऑगस्टपासून