शेतीकामांसाठी यंत्रमानवांचा वापर वाढणार

कृषिकिंग: शेती क्षेत्रामध्ये कृत्रिम बुध्दिमत्तेचा (आर्टिफिशियल इन्टेलिजन्स) वापर वाढत असून शेतीकामासाठी यंत्रमानव (अॅग्रिकल्चर रोबोट्स) तयार करण्यासाठी अनेक कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे भविष्यात शेतीकामांसाठी जगभर रोबोट्सचा वापर वाढेल, असे मत राज्याच्या कृषी खात्याचे निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
अमेरिकेच्या ब्ल्यु रिव्हर टेक्नॉलॉजी या कंपनीने अॅग्रिकल्चर रोबोट्स निर्मितीत आघाडी घेतली आहे. या कंपनीचा जास्त भर तणनियंत्रणात रोबोटसचा वापर करण्यावर आहे, असे पाटील म्हणाले. या कंपनीने सी अॅन्ड स्प्रे नावाचा एक रोबोट तयार केला आहे. कपाशीच्या शेतीत संगणकाच्या मदतीने तणांचा शोध घेत फवारणी करण्याचे तंत्र या रोबोटने आत्मसात केले आहे. या रोबोटमुळे अचूक फवारणीच्या माध्यमातून तणनाशक रसायनाची 80 टक्के बचत होते. याशिवाय खर्चात देखील 90 टक्के बचत होते, असे त्यांनी सांगितले.
ट्रॅक्टर निर्मितीतील आघाडीची कंपनी असलेल्या जॉन डिअरने सप्टेंबर 2017 मध्ये ब्ल्यु रिव्हर टेक्नॉलॉजी कंपनी विकत घेतली. जॉन डिअर कंपनीने संशोधनासाठी 305 दशलक्ष डॉलर्स इतकी रक्कम गुंतवली आहे. तसेच सध्या जगातील अनेक देशांत एमएफ स्कॅम्प रोबोट देखील आलेले आहेत. शेताचे रक्षण करणे, तणनियंत्रण आणि काढणी अशी तीनही कामे करण्यासाठी या रोबोटची रचना करण्यात आलेली आहे. या रोबोटला चाके आहेत. शेतातील तणांचा शोध घेवून तो तणांचा आराखडा तयार करतो आणि त्याच ठिकाणी फवारणी करतो. यामुळे शेतात मजुरीचा, तणनाशकाचा आणि ट्रॅक्टर खर्चात देखील बचत होते. या रोबोटला जीपीएस जोडण्यात आलेला आहे, असे पाटील म्हणाले.
डेन्मार्कमध्ये एपीआय प्लॅटफॉर्म हा रोबोट उत्तम काम करत आहे. ताशी 3.6 किलोमीटर वेगाने काम करणा-या या रोबोटला जीपीएस, जीआयएस, मोटार जोडण्यात आलेली आहे. हा रोबोट देखील फवारणीची कामे करतो. अमेरिकेच्या अॅरिझोना आणि कॅलिफोर्निया भागात क्रु रोबोटिक कंपनीचा एक रोबोट दिवसाला 8 एकर स्ट्रॉबेरी तोडतो आणि 30 मजुरांचे काम एकाच वेळी करतो.
बर्लिनमधील एका स्टार्टअप कंपनीने बेटस नावाचे यंत्र तयार केले असून पाने आणि मातीच्या परिक्षणातून ते शेतजमिनीमधील अन्नद्रव्याची कमतरता ते शोधून काढते. कॅलिफोर्नियाच्या ट्रेस जिनोमिक्सने आर्टिफिशियल इंटिलिजन्टसच्या आधारावर माती परिक्षणाची उत्तम प्रमाणी शोधून शेतक-यांना सखोल मार्गदर्शनाची सेवा सुरू केली आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

Read Previous

पेन्शन योजनेसाठी १५ ऑगस्टपर्यंत तीन कोटी शेतकऱ्यांची नोंदणी करणार

Read Next

शेती क्षेत्रातील बुडीत कर्जाचे प्रमाण वाढले