शेताच्या बांधांवर वृक्षलागवडीसाठी समिती स्थापन

कृषिकिंग: शेताच्या बांधांवर स्थानिक प्रजातीच्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती नेमली आहे. राज्य पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष अभिमन्यू काळे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. काळे यांनी गोंदियाचे जिल्हाधिकारी असताना, बांधावरील देशी वृक्षांची लागवड आणि संगोपनासाठी २०१७-१८ या वर्षात नाविन्यपूर्ण योजना राबवली होती. यावेळी जिल्ह्यात वृक्षतोडीचे परवाने मागणाऱ्या अर्जांची संख्या कमी झाल्याचा त्यांचा अनुभव होता. या योजनेला मिळालेले यश लक्षात घेऊन तिचा राज्यभरात विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही योजना राज्यभरात राबविण्यासाठी सूचना करण्यासाठी काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या समितीमध्ये सामाजिक वनीकरण विभागाचे नागपुरचे वनसंरक्षक अशोक गिरीपुजे, जुन्नर (जि.पुणे) चे वनसंरक्षतक जयराम गौडा, यवतमाळ येथील उपवनसंरक्षक अरविंद मुंडे, प्रयोगशील शेतकरी प्रतापराव चिपळुणकर, बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे (बी.एन.एच.एस.) डॉ. दिपक आपटे, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचा समावेश आहे. गोंदियाचे वनसंरक्षक एस.युवराज समितीचे सदस्य सचिव असतील.

Read Previous

राज्यात पुढील दहा वर्षांत तापमान आणि पाऊसमान वाढणार

Read Next

संतुलीत पशुआहारातील चाऱ्याचे महत्व