राज्यात 9 लाख हेक्टरवर सूक्ष्म सिंचन

कृषिकिंग: राज्यात गेल्या पाच वर्षात सुमारे ९ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे, अशी माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली. शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज करताना सोबत जोडण्यात येणाऱ्या कागदपत्रांची संख्या २४ वरुन ९ वर करण्यात आली. तसेच अर्ज स्वीकृतीसाठी ‘ई-ठिबक’ हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
योजनेसाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे, ‘नोंदणी ते अनुदान’ वितरणाची संपूर्ण कार्यवाही संगणकीय प्रणालीद्वारे होत आहे. या योजनेच्या प्रत्येक टप्प्यावरील कार्यवाहीबाबत लाभार्थी शेतकऱ्याच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे माहिती कळविली जाते. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आली आहे, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात २०१४ पासून सुमारे ९ लाख हेक्टर क्षेत्रावर सूक्ष्मसिंचन संचांची उभारणी करण्यात आली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी अतिरिक्त ३३७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, असे कृषिमंत्री म्हणाले.

Read Previous

पुरामुळे एक लाख हेक्टर शेतजमीन बाधित

Read Next

मूग पीक: भुरी रोग व मावा कीड नियंत्रण