राज्यात पुढील दहा वर्षांत तापमान आणि पाऊसमान वाढणार

कृषिकिंग: राज्याच्या सर्व महसूली विभागांच्या सरासरी वार्षिक तापमानात पुढच्या दहा वर्षांत वाढ होणार आहे, असा अंदाज द एनर्जी रिसर्च इन्स्टीट्यूट या संस्थेने व्यक्त केला आहे. पुढील दोन दशकांत देशातील, राज्यातील शेतीवर काय परिणाम होतील, या परिणामांना सामोरे जाण्यासाठीची उपाययोजना यांचा अभ्यास करण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने या संस्थेवर सोपवली आहे. या संस्थेने २०३०, २०५० आणि २०७० मध्ये होणाऱ्या संभाव्य हवामान बदलाचे अंदाज वर्तवले आहेत.
विदर्भ आणि मराठवाड्यात होणारी तापमान वाढ (कमाल व किमान) सर्वाधिक असेल. राज्याच्या सर्व महसूली विभांगांमध्ये सरासरी वार्षिक पर्जन्यमानातही वाढ होणार आहे.
पर्जन्यमानातील सर्वाधिक वाढ (१७.५ ते ४० मिलीमीटर) नाशिक विभागात होणार आहे. त्यानंतर पुणे (१० ते ३२.५ मिलीमीटर) आणि अमरावती (१७. ५ – ३० मिलीमीटर) असा क्रम आहे. कोकणामध्ये दरसाल सुमारे २५७८.२ मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. २०३० पर्यंत त्यामध्ये १० ते ३० मिलीमीटरची वाढ होणार आहे, असे संस्थेच्या अहवालात नमूद केले आहे.
वार्षिक पर्जन्यमानात वाढ होणार असली तरीही पावसाचं प्रमाण कुठे, केव्हा आणि किती असेल हे अजून स्पष्ट झालेले नाही. ते येत्या दहा- वीस वर्षांमध्ये स्पष्ट होईल, असे संस्थेने म्हटले आहे. सदर अहवालात नोंदवल्यानुसार तापमानवाढीमुळे सोयाबीन आणि कापूस ह्या पिकांच्या दर एकरी उत्पादनाला फटका बसेल. मात्र ज्वारीच्या आणि धानाच्या उत्पादनात वाढ होऊ शकेल.

Read Previous

महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 17 ऑगस्टपासून

Read Next

शेताच्या बांधांवर वृक्षलागवडीसाठी समिती स्थापन