यवमाळ जिल्ह्यात 20 टक्के क्षेत्रावर एच.टी.बी.टी. कापूस

कृषिकिंग: यवतमाळ जिल्ह्यात सुमारे 20 टक्के क्षेत्रावर बंदी घातलेल्या एच.टी.बी.टी. कापूस वाणाची लागवड झाल्याची माहिती कृषी खात्याच्या अधिकाऱ्याने दिली. जिल्ह्यात यंदा सुमारे साडे चार लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झालेली आहे. त्यातील सुमारे 20 टक्के क्षेत्रावर एच.टी.बी.टी. कापूस बियाण्यांची पेरणी झाली असल्याचा अंदाज आहे.
एच.टी.बी.टी. बियाणे ग्लायफोसेट या तणाला सहनशील आहे. म्हणजे या बियाण्यांची लागवड केल्यावर ग्लायफोसेट तणनाशकाची फवारणी केली तर केवळ तण नष्ट होते, पिकाला धक्का लागत नाही. मोन्सॅन्टो कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. परंतु बी.टी. कापसाच्या रॉयल्टीच्या मुद्यावरून केंद्र सरकारशी वाद चालू असल्याने एच.टी.बी.टी. कापसाला मान्यता देण्यासाठीचा प्रस्ताव कंपनीने मागे घेतला. त्यामुळे या बियाण्यांना कायदेशीर मान्यता नाही. परंतु शेतकऱ्यांच्या तंत्रज्ञान स्वातंत्र्याचा मुद्दा पुढे करून शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने या बिण्यांची उघडपणे लागवड करण्याचे सविनय कायदेभंग आंदोलन यंदाच्या खरीप हंगामात हाती घेतले. यवमाळसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांत गेल्या तीन वर्षांपासूनच थोड्या-फार प्रमाणावर या बियाण्यांची लागवड होत होती. परंतु यंदा मात्र लागवडीच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे.
कृषी खात्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यात सुमारे साडे चार लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झालेली आहे. एवढ्या क्षेत्रासाठी सुमारे बियाण्यांची 11.25 लाख पाकिटे लागतात. परंतु प्रत्यक्षात बियाण्यांच्या अधिकृत विक्रीचा आकडा कमी आहे. अधिकृतपणे विकले गेलेले बियाणे आणि कापसाचे लागवड क्षेत्र यातील तफावत एच.टी.बी.टी. बियाण्यांनी भरून काढल्याचे यावरून स्पष्ट होते, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Read Previous

पिकविमा योजना अधिक शेतकरीस्नेही करणार

Read Next

अलमट्टीतून पाणी उशीरा सोडल्याने महाराष्ट्राला पुराचा फटका