महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 17 ऑगस्टपासून

कृषिकिंग: कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे स्थगित केलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा 17 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. पूर ओसरत असला तरी पूरबाधितांच्या पुनर्वसनाचे आणि आरोग्याचे आव्हान अद्याप कायम असताना मुख्यमंत्री मात्र पुन्हा प्रचारदौऱ्यावर निघाले असल्याची टीका होत आहे. महाजनादेश यात्रेत गुंतल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे पुराच्या समस्येकडे सुरूवातीला दुर्लक्ष झाल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला होता.
सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूरस्थितीची हाताळणी करण्यात राज्य सरकार कमी पडल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांनी मुंबईला जाऊन आढावा घेण्यात आणि प्रत्यक्ष पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात उशीर केला. तसेच अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा, अशी मागणी कोल्हापूरच्या जिल्हा प्रशासनाने एक ऑगस्ट रोजीच केलेली असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करण्यास उशीर केला. तसेच हवा तेवढा पाठपुरावाही झाला नाही. त्यामुळे अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात दिरंगाई झाला. त्याचा मोठा फटका बसला. तसेच राज्य मंत्रिमंडळातील वजनदार मंत्र्यांची वर्तणुकही टीकेचा विषय ठरली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख वादाच्या भोवऱ्यात सापडले. प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय नेतृत्व यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून आला. आता पुराचे पाणी ओसरत असले तरी बाधितांच्या पुनर्वसनाचा आणि रोगराईचा प्रश्न गंभीर आहे. या कामी सरकारी यंत्रणांची कसोटी लागणार आहे. अशा प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत तळ ठोकून या कामांत जातीने लक्ष घालणे आवश्यक असताना त्यांनी महाजनादेश यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
१७ ऑगस्टपासून या यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होणार असून त्यासाठीचे नियोजन सुरू झाले आहे. यात्रेचा पहिला टप्पा विदर्भात झाला तर दुसऱ्या टप्प्यात नगर आणि मराठवाड्यातून ही यात्रा सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ९३ विधानसभा मतदारसंघांत २,७४५ किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे.
१८ ऑगस्ट रोजी यात्रा नगर जिल्ह्यात येणार असून या दिवशी अकोले व संगमनेरला मुख्यमंत्र्यांच्या सभा होणार आहेत. तसेच याच दिवशी राहुरी आणि नगरला स्वागत समारंभ होणार आहे. तर १९ ऑगस्ट रोजी पाथर्डी, आष्टी आणि जामखेड येथे सभा घेऊन मुख्यमंत्री बीडला रवाना होणार आहेत.
दरम्यान, सांगली, कोल्हापूरसह कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही पुराने थैमान घातले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. परंतु राज्य सरकारने कोकणाकडे पूर्ण पाठ फिरविली असून केवळ दोन कोटींची अत्यल्प मदत कोकणाला दिली आहे. सरकारचा एकही मंत्री या भागाकडे फिरकला नाही. सरकारच्या या भूमिकेवर कोकणात संताप व्यक्त होत आहे.

Read Previous

सिंचनामुळे मॉन्सूनला उशीर?

Read Next

राज्यात पुढील दहा वर्षांत तापमान आणि पाऊसमान वाढणार