मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला उशीर

  • कृषिकिंग :मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात उशीर झाला असून तो जून मध्येच करणे आवश्यक होते, असे मत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले. दीर्घकाळ रखडलेला कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला शुक्रवारी (ता. 9) औरंगाबाद येथे सुरूवात करण्यात आली.

राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसह अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा सामना करावा लागत असताना मराठवाड्यातील आठ जिल्हे मात्र अद्यापही कोरडेच आहेत. मॉन्सूनचे आगमन झाल्यापासून मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. दुष्काळाचे सावट तीव्र झाल्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरूवातीला निविदा प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे आणि नंतर योग्य ढग सापडत नसल्याने कृत्रिम पावसाचा प्रयोग रखडला होता. शुक्रवारी ढगांवर फवारणी करण्यात आलेली असली तरी त्यामुळे पाऊस पडलेला नाही.

“सध्या कृत्रिम पावसासाठी उपयुक्त ढग सापडत नाहीत. औरंगाबादपासून 40 किमी अंतरावर ढगांवर फवारणी करण्यात आली आहे. त्याचे निष्कर्ष मात्र अद्याप हाती आलेले नाहीत,” असे देऊळगावकर म्हणाले.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील एकूण 1.87 कोटी लोकसंख्या दुष्काळाच्या सावटाखाली आहे. या भागातील मांजरा, माजलगाव, तेरणा, कोळेगाव, दुधना आदी मोठ्या प्रकल्पांत शून्य पाणीसाठा आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. नाशिक जिल्ह्यात गोदावरी खोऱ्यात चांगला पाऊस झाल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणात मात्र 69.12 टक्के पाणीसाठा झाला आहे. उर्वरीत मराठवाडा मात्र पाणीबाणीच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Read Previous

जनावरांमधील ब, ड आणि ई जीवनसत्वाच्या कमतरतेची लक्षणे

Read Next

पीएम किसानः यंदा 10 कोटी शेतकऱ्यांना लाभ देणार