बीड जिल्ह्यातील 18 चारा छावण्यांवर कारवाई होणार

कृषिकिंग,बीड: जनावरांची संख्या फुगवून दाखवून सरकारी अनुदान लाटणाऱ्या बीड जिल्ह्यातील 18 चारा छावण्यांवर कारवाई करणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी (ता.२५) विधान परिषदेत दिली.  महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने केलेल्या पाहणीत चार चाऴण्यांतील घोटाळा उघडकीस आला होता. या पथकाच्या तपासणीत 17 हजार जनावरांची तफावत आढळून आली होती. दरम्यान जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी याआधीच या 18 चारा छावण्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. छावण्यांतील जनावरांची संख्या अचानक का घटली, या संस्थांवर फौजदारी गुन्हे का दाखल करू नयेत, या संस्थांना काळ्या यादीत का टाकू नये, संस्थांवर दंडात्मक कारवाई का करू नये,  यासंदर्भात खुलासा मागविण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी चारा छावण्यातील घोटाळ्याला जबाबदार धरत संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना पाठवल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

Read Previous

आगामी हंगामात उसाला चांगला दर मिळणार

Read Next

गुजरातच्या शेतकऱ्यांचा कापसाऐवजी भूईमुगाकडे कल