पेन्शन योजनेसाठी १५ ऑगस्टपर्यंत तीन कोटी शेतकऱ्यांची नोंदणी करणार

कृषिकिंग: पंतप्रधान शेतकरी मानधन योजना या पेन्शन योजनेसाठी सार्वजनिक सुविधा केंद्रांच्या (कॉमन सर्विस सेंटर) माध्यमातून १५ ऑगस्टपर्यंत देशातील तीन कोटी शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
ही पेन्शन योजना दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी आहे. १८ ते ४० वयोगटातील शेतकरी त्यासाठी पात्र असतील. शेतकऱ्याने महिन्याला ५५ ते २०० रूपयांचा हप्ता भरायचा आहे. सरकार तेवढीच रक्कम त्या शेतकऱ्याच्या नावे भरणार आहे. शेतकऱ्याने वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यानंतर त्याला महिन्याला साधारण तीन हजार रूपयांची रक्कम मिळेल, अशा स्वरूपाची ही योजना आहे. एलआयसीकडून या योजनेचे व्यवस्थापन केले जाणार आहे.
देशात इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान खात्याच्या अखत्यारित ग्रामीण भागात सार्वजनिक सुविधा केंद्र चालवली जातात. इ-सेवा केंद्र या नावाने ती ओळखली जातात. देशभरात सुमारे तीन लाख सार्वजनिक सुविधा केंद्र आहेत. यातील प्रत्येक केंद्राला १५ ऑगस्टपर्यंत किमान शंभर शेतकऱ्यांची पेन्शन योजनेसाठी नोंदणी करण्यास सांगितले आहे, अशी माहिती सार्वजनिक सुविधा केंद्र (सीएससी) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिनेश त्यागी यांनी दिली. ही केंद्रे १५ ऑगस्टलाही सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी आधार कार्ड आणि बॅंकेचे पासबुक घेऊन शेजारच्या सार्वजनिक सुविधा केंद्रावर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Read Previous

कोल्हापुरात पावसाची विश्रांती

Read Next

शेतीकामांसाठी यंत्रमानवांचा वापर वाढणार