पूरग्रस्त गावांच्या स्वच्छतेसाठी पाच कोटींचा निधी

कृषिकिंग: राज्यातील पूरग्रस्त गावांतील स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतींना पाच कोटी रुपयांच्या विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. एक हजार लोकसंख्येपर्यंतच्या ग्रामपंचायतींना ५० हजार तर एक हजारापेक्षा अधिक लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना एक लाख रुपये निधी प्राथमिक स्वरूपात त्वरित वितरित करण्यात येणार आहे, असे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. तसेच पूरग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा लवकरच सुरळीत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली पूरग्रस्त भागातील पाणीपुरवठा योजना व स्वच्छतेबाबतची आढावा बैठक मंत्रालयात मंगळवारी (ता. 13) झाली. या वेळी पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, अतिरिक्त मुख्य सचिव श्यामलाल गोयल आणि विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूरमध्ये सुमारे ६०४, सांगलीमध्ये १३०, साताऱ्यामध्ये ९८ पाणीपुरवठा योजनांचे नुकसान झाले आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
पूरग्रस्त भागांतील स्वच्छता मोहीम व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत करण्यावर भर दिला असल्याचे लोणीकर यांनी सांगितले. तात्पुरत्या उपाययोजना राबविण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या उद्भवाची तातडीने तपासणी करावी. त्या ठिकाणी टी. सी.एल. पावडर, क्लोरीनचा वापर करून जे पाणी पिण्यायोग्य आहे, त्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा. तसेच या भागातील जे जलस्रोत दूषित आहेत, त्या जलस्रोतांची तातडीने तपासणी करून पाणी पिण्यायोग्य करण्यात यावे, असे आदेश त्यांनी दिले. विहीरी व पााणीपुरवठा योजनांचे सर्वेक्षण करून दुरूस्तीचा एकत्रित प्रस्ताव सादर करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

Read Previous

देशातील वाहन उद्योग मंदीच्या विळख्यात

Read Next

संतुलीत पशुआहारातील पाण्याचे महत्व