पीएम किसानः यंदा 10 कोटी शेतकऱ्यांना लाभ देणार

कृषिकिंग:यंदाच्या वर्षी देशातील 10 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा (पीएम-किसान) लाभ देण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रूपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वार्षिक सहा हजार रूपयांचे थेट आर्थिक साहाय्य केले जाते. रक्कम शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात जमा केली जाते.
देशात आतापर्यंत 5.88 कोटी लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना दोन हजार रूपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे. तर सुमारे 3.40 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दुसरा हप्ताही जमा झाला आहे, असे तोमर यांनी सांगितले. प. बंगाल वगळता देशातील सर्व राज्ये या योजनेत सहभागी झाले असून योजनेची आतापर्यंतची प्रगती चांगली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी रोजी पीएम-किसान योजनेची घोषणा केली होती. सुरूवातीला ही योजना केवळ दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या लहान व सीमांत शेतकऱ्यांसाठी होती. सुमारे 12.5 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणे अपेक्षित होते. परंतु नंतरच्या टप्प्यात ही योजना जमीनधारणेचा विचार न करता सरसकट सर्व शेतकऱ्यांना लागू कऱण्यात आली. त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत आणखी दोन कोटी शेतकऱ्यांची भर पडली. त्यामुळे आता एकूण 14.5 कोटी शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. या योजनेसाठी 2019-20 या वर्षात एकूण 87 हजार 217 कोटी रूपयांच्या निधीची आवश्यकता आहे.

Read Previous

मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला उशीर

Read Next

निकृष्ट चाऱ्यामुळे म्हशीवर होणारे परिणाम