देशातील वाहन उद्योग मंदीच्या विळख्यात

कृषिकिंग: देशातील वाहन क्षेत्रात यंदा सलग नवव्या महिन्यात घसरण झालेली आहे. जुलै महिन्यात गेल्या वीस वर्षांतील सगळ्यात कमी वाहनविक्री नोंदवण्यात आली. दुचाकी आणि चारचाकीची विक्री कमी झाल्याचा विपरित परिणाम वाहन निर्मिती क्षेत्रावर झाला आहे. वाहन उत्पादक, सुटे भाग तयार करणारे उद्योग आणि वितरक यांनी गेल्या एप्रिल महिन्यांपासून ३,५०,००० कामगारांना कमी केल्याचे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिले आहे. कार आणि दुचाकी निर्मिती कंपन्यांनी १५ हजार, तर सुटे भाग तयार करणाऱ्यांनी १ लाख कामगार कपात केली आहे. तसेच अनेकांनी उत्पादनही बंद केले आहे. जवळपास पाच कंपन्यांनी कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या तब्बल ३,५०,००० कर्मचाऱ्यांचा रोजगार गेल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
वाहन वितरकांची संघटना असलेल्या ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशन’च्या (फाडा) आकडेवारीनुसार महाराष्ट्रात जून महिन्यात वाहनांच्या विक्रीत गतवर्षीच्या तुलनेत २०.३९ टक्क्यांची घट झाली. गेल्या वर्षी या महिन्यात १ लाख ९६ हजार ८६७ वाहनांची विक्री झाली होती. त्यात घट होऊन या वर्षी ती १ लाख ५६ हजार ७१६ इतकी खालावली आहे. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून २०१९) देशभरातील वाहनांच्या विक्रीत सहा टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. ‘फाडा’च्या आकडेवारीनुसार या वर्षी फेब्रुवारीपासून सातत्याने वाहन विक्रीत घट होत आहे.
‘वाहन क्षेत्राला मागील दहा महिन्यांपासून मंदीचे चटके जाणवत आहेत. त्यामुळे अनेक विक्रेत्यांनी जवळपास ७ ते ८ टक्के कर्मचारी कपात केली आहे. मार्च २०१९ पर्यंतच्या आकडेवारीनुसार १८ महिन्यांमध्ये सुमारे २८६ शोरूम बंद कराव्या लागल्या आहेत. अनेकांनी आपल्याकडील गाडय़ांचा साठाही कमी केला आहे,’ अशी माहिती ‘फाडा’चे अध्यक्ष आशीष काळे यांनी दिली.
देशातील वाहनक्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी करकपात करून अर्थ पुरवठा सुलभ करण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे करण्यात आली आहे.

Read Previous

अलमट्टीतून पाणी उशीरा सोडल्याने महाराष्ट्राला पुराचा फटका

Read Next

पूरग्रस्त गावांच्या स्वच्छतेसाठी पाच कोटींचा निधी