कोल्हापुरात पावसाची विश्रांती

कृषिकिंग: कोल्हापूर मध्ये पावसाने विश्रांती घेतली असून पुरामुळे विस्कटलेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. कोल्हापूर शहरात पाणी ओसरण्यास सुरूवात झाली आहे. परंतु शिरोळ आणि चंदगड तालुक्यांत पुराचे संकट कायम आहे. सांगली शहरात पाणी कमी होत असले तरी अजूनही पाणी धोक्याच्या पातळीवर आहे.
पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्ग आज (ता. १२) सकाळपर्यंत वाहतुकुीसाठी बंद होता. आज दिवसभरात तो खुला होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवडाभरापासून महामार्ग बंद आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरात पेट्रोल व इतर जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा जाणवत आहे. गोकुळ दुधसंघाने जिथून शक्य आहे, तिथून दुधाचे संकलन सुरू केले आहे. त्यामुळे शहरात दुधाची उपलब्धता वाढली आहे. कोल्हापूर शहरातून पन्हाळ्याकडे जाणारा मार्ग जागोजागी खचला असल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंदच आहे.
दरम्यान, पूरग्रस्त कुटुंबांना प्रति कुटुंब पाच हजार रूपयांची आर्थिक मदत रोखीने द्यावी आणि उर्वरीत रक्कम बॅंक खात्यात जमा करावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मंत्रालयातील राज्य आपत्कालिन कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. पुरात अडकलेल्या एकूण ४ लाख ४८ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या नागरिकांसाठी ३७२ तात्पुरती निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. अतिवृष्टी आणि पुरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांत मिळून एकूण ४० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. पूर ओसरल्यानंतर बाधितांच्या पुनर्वसनाचे मोठे आव्हान उभे राहणार आहे. तसेच रोगराई आणि साथीच्या आजाराची बिकट स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. परदेशी यांना नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामाचा मोठा अनुभव आहे. ते राज्यातील तसेच केरळ, भूज तसेच संयुक्त राष्ट्रातही नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसन कार्यात वेळोवेळी सहभागी झालेले आहेत. लातूर येथे १९९३ साली भूकंप झाला त्यावेळी जिल्हाधिकारी या नात्याने त्यांनी भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम पार पाडले होते.

Read Previous

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला उठाव नाही

Read Next

पेन्शन योजनेसाठी १५ ऑगस्टपर्यंत तीन कोटी शेतकऱ्यांची नोंदणी करणार