केवळ लहान व सीमांत शेतकऱ्यांनाच पेन्शन मिळणार

कृषिकिंग दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जाहीर केलेली शेतकरी पेन्शन योजना केवळ लहान व सीमांत शेतकऱ्यांसाठी लागू आहे. सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत यासंदर्भात दिलेल्या माहितीतून ही बाब स्पष्ट झाली.या योजनेच्या माध्यमातून लहान व सीमांत शेतकऱ्यांना वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा तीन हजार रूपयांचे निवृत्तीवेतन दिले जाणार आहे. ही योजना ऐच्छिक असून 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी त्यात सहभागी होऊ शकतात. सहभागी शेतकऱ्याला पेन्शन फंडात दरमहा शंभर रूपये जमा करावे लागतील. केंद्र सरकार तेवढीच रक्कम या फंडात जमा करणार आहे.

लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) या पेन्शन फंडाचे व्यवस्थापन करणार आहे, असे कृषिमंत्र्यांनी राज्यसभेत दिलेल्या उत्तरात नमूद केले आहे.पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत थेट सहभागी होता येणार आहे. अन्यथा कॉमन सर्विस सेंटरच्या माध्यमातून शेतकरी या योजनेसाठी नोंदणी करू शकतील. पीएम-किसान निधी योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रूपयांचे अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. त्यातून पेन्शन योजनेसाठी शेतकऱ्यांचा वाटा परस्पर वळता करून घेण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

Read Previous

यंदा देशातील भात उत्पादन घटणार

Read Next

अंड्याचे दर रु/शेकडा