कर्जमाफी योजना सुरूच राहणारः सहकारमंत्री

कृषिकिंग: सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम मिळेपर्यंत राज्य सरकारची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरूच राहणार आहे, असे राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत ५० लाख २७ हजार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. त्यासाठी २४ हजार १०२ कोटी रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट जमा करण्यात आली आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
देशातील ही सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचा दावाही त्यांनी केला. यापूर्वी पंजाब राज्याने १० हजार कोटी रुपयांची, आंध्र प्रदेश १५ हजार कोटी रुपयांची, कर्नाटक ८ हजार कोटी, तेलंगणा १० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याच्या या कर्जमाफी योजनेत प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरीत्या दीड लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात येते. एकाच कुटुंबातील व्यक्तीचे प्रत्येकी दीड लाखापर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात आले. नवीन कर्ज घेण्यासाठी कर्जाचे पुर्नगठण करण्यात आले. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुध्दा २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली. अद्याप कर्जमाफीची प्रक्रिया सुरूच आहे.
दरम्यान, कर्जमाफी योजना जाहीर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 89 लाख शेतकऱ्यांचे एकूण 34 हजार कोटी रूपयांचे कर्ज माफ करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. परंतु कर्जमाफी योजनेसाठी घातलेल्या अटी, निकष आणि बॅंकांकडून मिळालेल्या माहितीतील तफावत आदी कारणांमुळे कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी आणि कर्जमाफीची एकूण रक्कम यात मोठी घट झाली आहे. कर्जमाफीची रखडलेली प्रक्रिया, पात्र असूनही कर्जमाफीपासून वंचित राहिल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी यामुळे विरोधी पक्षांनी या योजनेवर टीकेची झोड उठवली होती.

Read Previous

कृत्रिम पावसाचा प्रयोग फसल्याने मराठवाड्यात दुष्काळ अटळ

Read Next

ऊस सल्ला : पांढरी माशी नियंत्रण उपाय