असे ठेवा करडांचे व्यवस्थापन

करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आहार, भरपूर व्यायाम आणि काटेकोर सांभाळ महत्वाचा आहे. करडांसाठी कप्पे मोकळे, हवेशीर, उबदार, कोरडे असणे गरजेचे असते. पशूतज्ज्ञांच्याकडून करडांची तपासमीकरून घ्यावी.

करडांच्या वाढीच्या वयाचे साधारण तीन टप्पे असतात. जन्मापासून दोन महिने वय, दोन ते चार महिने वय आणि चार ते सहा महिने वय अशा गटांत करडांची विभागणी योग्य ठरते. महत्त्वाची बाब अशी, की पहिल्या सहा महिन्यांत दर पंधरा दिवसांस करडे सांभाळण्याचे व्यवस्थापन गरजेनुसार बदलावे लागते. जन्मानंतर लगेच शरीरवजनांच्या नोंदीवरून करडे अशक्त आहेत का सशक्त आहेत, याचा अंदाज बांधता येतो. अशक्त करडे पहिले पंधरा दिवस सांभाळावी लागतात. बाह्य वातावरण अतिउष्ण असो किंवा अति थंड असो, करडांच्या कप्प्यात गरजेनुसार पंखे किंवा विद्युत दिवे लावून तापमान नियंत्रित करणे प्रमुख गरजेचे समजावे.करडांच्या कप्प्यात असणारे तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअस एवढे असावे. कप्प्यात तापमान वाढीस पूरक असल्यास करडांच्या शरीरातील ऊर्जा (शरीर तापमान) बाह्य वातावरणाप्रमाणे बदलून संतुलित राहण्यासाठी खर्ची पडत नाही.

आरोग्य व्यवस्थापन

करडांच्या कप्प्यातील तापमानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे मरतुकीचे सत्र सुरू होते. अति थंड बाह्य हवामानास गोठ्यात उबदारपणा, उष्णतामान वाढविण्यासाठी विद्युत दिवे उपयोगी पडतात. अति थंड वातावरणात आर्द्रतेमुळे करडांचे कप्पे लवकर कोरडे होत नाहीत. लेंड्या, पातळ हगवण किंवा मूत्र यामुळे कप्प्यात ओल राहते; मात्र दिवसातून तीन-चार वेळा जागा बदलून करडे कोरड्याच ठिकाणी राहतील याची काळजी घ्यावी. करडांच्या कप्प्यात गोणपाटाचा वापर केल्यास ओल शोषली जाऊ शकते, जमिनीत चुनखडीचा थोडा वापर ओल शोषण्यास मदतीचा ठरतो. फरशीपेक्षा मुरूम, मातीची धुम्मस केलेली जमीन अधिक गरम असते.बाह्य वातावरणात थंडी असल्यास दुरडीखाली चार-पाच करडे दिवसभर ठेवून काम टाळणारे शेळीपालक सर्वत्र दिसतात. एका दुरडीखाली चार-पाच करडे, म्हणजे मोकळी हवा मिळणे कठीण आणि श्‍वसनाचे रोग पसरण्यास वाव निर्माण होतो. दुरडीमुळे शरीर हालचाल पूर्ण बंद होते. व्यावसायिक शेळी प्रकल्पावर दुरडीमुळे होणारे सगळे तोटे गांभीर्याने टाळले जाणे आवश्‍यक ठरते.सतत चार-पाच दिवस पावसाची झड असणाऱ्या भागात करडांच्या सांभाळाचा प्रश्‍न अधिक क्‍लिष्ट असतो. ऊब निर्माण करण्यासाठी रात्री व पहाटे स्वतःच्या देखरेखीखाली शेकोट्या कराव्यात.भिजलेल्या शेळ्यांबरोबर करडे ठेवू नयेत.

ऋतू कोणताही असो, करडांना स्वच्छ, निर्जंतुक पाणी द्यावे.बाह्य वातावरणात एकदम झालेला बदल करडांना सहन होऊ शकत नाही अचानक घडणारे बदल करडांच्या शरीरात ताण निर्माण करतात. अशा वेळी रोगजंतू फैलावतात. प्रतिकूल बाह्य वातावरण, रोगाची लागण, कमी झालेली शरीरक्षमता, अशक्तपणा म्हणजे करडांच्या वाढीवर मोठा परिणाम घडविणारी स्थिती निर्माण होते.रोग-जंतू सर्वत्र असतात, निरोगी शरीरातही दडून असतात. उच्च शरीरस्वास्थ्य असल्याने रोगफैलाव घडू शकत नाही; मात्र शरीरावर ताण आला, की ऋतूनुसार अथवा अवकाळी रोगही शरीरावर प्रादुर्भाव करतात.

करडांची वाढ

दूध पिणाऱ्या करडांस शेळीपासून दूर सांभाळणे गरजेचे असते. पहिल्या पंधरवड्यात चार-पाच वेळा दूध पिण्यासाठी तास-अर्धा तास मातेजवळ ठेवावे. इतर वेळी वेगळ्या कप्प्यात हिंडू द्यावे. व्यायाम नसणारी करडे अपचनास बळी पडतात. करडांच्या कप्प्यात मोकळी जागा असल्यास त्यांना मोकळे फिरणे, उड्या मारणे शक्‍य होऊ शकेल. दुरडीखाली सतत बंदिस्त झालेली करडे अशक्त आणि दुर्बल राहतात.आज सुदृढ असणारी करडे भविष्यात कोणत्याही कारणाने आजारी पडणार नाहीत, यासाठी त्यांची शरीरक्षमता काही प्रमाणात वाढविता येते. असे उपाय प्रतिबंधात्मक लसीकरणाप्रमाणे उपयुक्त ठरतात. करडांना पावसाची झड सुरू होताच प्रतिजैविकांच्या गोळ्या आणि जीवनसत्त्वांच्या मात्रा देता येतात. असा उपचार शरीर ताण निर्माण होऊ न देण्यास उपयुक्त ठरतो.

करडांत माती चाटणे, परजीवी प्रसार होणे, बाह्य परजीवींचा त्रास असणे, असे प्रकार नेहमीच दिसून येतात. बाह्य परजीवी सुदृढ करडांकडे फिरकत नाहीत. याउलट अशक्त करडे दिवसभर माश्‍यांच्या प्रादुर्भावाने त्रस्त असतात. वाढीस लागलेल्या करडांना क्षार कमतरता असल्यास ते माती चाटतात आणि यातूनच पोटात जंतही वाढतात.प्रत्येक करडास जन्मानंतर 15 दिवसांत, तर पुढे दर महिन्यास एकदा जंतनाशन करावे. करडे सहा महिन्यांची वाढेपर्यंत जंतनाशक मात्रा अत्यंत उपयोगी पडतात. बाह्य आणि पोटातील कृमीनाशनामुळे करडांचा शरीर ताण मोठ्या प्रमाणावर कमी होतो.करडांची वाढ जोमाने होण्यासाठी तीन-चार करडे असणाऱ्या शेळीस दूध कमी असू शकते. अशा वेळी करडांना बाहेरून बाटलीने दूध पाजावे. पाने तोडणाऱ्या करडांसाठी कप्प्यात हिरवा लुसलुशीत चारा टांगून ठेवावा. वाढीच्या वयाप्रमाणे कप्प्याची जागा वाढवावी आणि गटवारीनुसार करडे वेगळे करावेत. तीन महिन्यांनंतर नर व मादी करडे वेगळी करावीत, तर खच्चीकरणानंतर नर करडे मांसल बनविता येऊ शकतात.

स्त्रोत – विकासपिडिया

Read Previous

२०२१ची जनगणना होणार पूर्णपणे डीजीटली

Read Next

देशात कापसाचे उत्पादन २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता