अलमट्टीतून पाणी उशीरा सोडल्याने महाराष्ट्राला पुराचा फटका

कृषिकिंग: कर्नाटकने अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग करण्यास उशीर केल्यामुळेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत भीषण पूरस्थितीला तोंड द्यावे लागले, असा अभ्यासकांचा दावा आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात तांत्रिक आणि राजकीय समन्वयाचा अभाव असल्यामुळेच ही स्थिती ओढवली असे त्यांचे म्हणणे आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना यंदा पुराचा मोठा तडाखा बसला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना अलमट्टीचा विसर्ग वाढविण्याची विनंती करण्यात दिरंगाई केली आणि येडीयुरप्पा यांनीही अपेक्षित प्रतिसाद दिला नाही, अशी टीका होत आहे. कोयना, वारणा या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने पाणलोट क्षेत्रात पुराची स्थिती असताना आणि पुढील चोवीस तासात अलमट्टीत प्रतिसेकंदाला पावणेतीन लाख क्युसेक पाणी येईल, हे माहित असतानाही कर्नाटकने संथ डिस्चार्ज ठेवत आडमुठेपणा केल्याचे महसुल यंत्रणेचे म्हणणे आहे.
अलमट्टीच्या मुळ फुगवटयावर पुन्हा इकडून महाराष्ट्राने सोडलेल्या पाण्याचाही फुगवटा तयार होतो. यामुळे कृष्णेत एका फुगवटयावर पुन्हा दुसरा फुगवटा चढून गुंतागुंतीची स्थिती तयार होते. त्यामुळे पूर वहन प्रक्रियेत मोठा अडथळा येतो, असे मत जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव आणि कृष्मा पाणी तंटा लवादाचे सदस्य नंदकुमार वडनेरे यांनी व्यक्त केले. “यंदा अलमट्टीतून साडेपाच लाख क्युसेकने पाणी आधीपासून सोडत राहिले असते तर महाराष्ट्रात पुराचे संकट आले नसते. आरोडाओरड झाल्यावर शेवटच्या क्षणी एकदम साडेपाच-सहा लाखाने जादा पाणी सोडून कर्नाटकने स्वतःही संकट ओढून घेतल्याचे दिसतेय.”, असे वडनेरे म्हणाले.
अलमट्टीची क्षमता 123 टीएमसी (अब्ज घनफूट) आहे. महाराष्ट्रातून कृष्णेचे सर्व पाणी शेवटी अलमट्टीच्याच दिशेने जाणार असते. कोयनेतून सोडले जाणारे पाणी व कोयना ते कोल्हापूर या दरम्यानच्या मुक्त क्षेत्रातील पुर व पावसाचे पाणी यंदा 200 ते 250 टीएमसीच्या आसपास होते. ‘अलमट्टी’च्या क्षमतेपेक्षाही दुप्पट पाणी वरच्या भागात असताना कर्नाटकने अधाशासारखे पाणी अडवून ठेवण्याचा खटाटोप केला, असे सूत्रांचे म्हणणे आहे. एक ऑगस्ट ते दहा ऑगस्ट या दरम्यान महाराष्ट्रातून अलमट्टीत सरासरी चार लाख 64 हजार क्युसेक पाणी येत (इनफ्लो) होते. मात्र, अलमट्टीतून विसर्ग (डिस्चार्ज) तीन लाख 91 हजार क्युसेकचा राहिला. अलमट्टीचा विसर्ग पाच लाख 20 हजार क्युसेकपर्यंत नेणे शक्य आहे, विसर्ग तातडीने वाढवा, अशी विनंती महाराष्ट्राकडून कर्नाटक सरकारला केली जात होती. पण चार दिवस अलमट्टीचा विसर्ग चार लाख क्युसेकच्या पुढे नेला गेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.
पावसाळ्याच्या सुरूवातीपासूनच अलमट्टी धरणातून थोडे-थोडे पाणी न सोडता पाण्याचा प्रचंड साठा केल्यामुळे पाण्याचा फुगवटा आला. त्यामुळे हे सगळे पाणी पसरले आणि नुकसान झाले, असे मत ज्येष्ठ पर्यावऱणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले. अतिवृष्टीच्या जोडीला प्रशासनाचा निष्काळजीपणा नडल्याचे त्यांनी सांगितले. धरणांखालच्या नद्यांचे पात्र पूर्णपणे कोरडे पडू न देता वर्षभरात धरणातून थोडे-थोडे पाणी सोडत राहिले पाहिजे. त्यामुळे नदीच्या पात्रात पाणी झिरपून भूजलाचा स्तर वाढेल, नदीतील जलचर जिवंत राहतील, असे ते म्हणाले. परंतु शासकीय यंत्रणा धरणे तुडुंब भरण्याची वाट पाहत राहतात आणि हाहाकार उडाल्यास एकदम पाणी सोडून देतात, यावर त्यांनी बोट ठेवले.
दरम्यान, पूरस्थिती आणि पाण्याचा विसर्ग या मुद्यावरून महाराष्ट्र आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री आता एकमेकांना दोष देत आहेत, या दोघांविरोधात गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी याचिका दाखल करणार आहे, असे अखिल भारतीय किसान कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी सांगितले.

Read Previous

यवमाळ जिल्ह्यात 20 टक्के क्षेत्रावर एच.टी.बी.टी. कापूस

Read Next

देशातील वाहन उद्योग मंदीच्या विळख्यात